पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या तब्बल 216 उद्याने, एक मत्स्यालय आणि एक प्राणी संग्रहालय कार्यरत आहे. ही ठिकाणे पुणेकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षित करतात. नागरिकांच्या आरोग्य, मनोरंजन आणि पर्यावरणीय संतुलनासाठी ही ठिकाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार नागरिकांसाठी उद्याने आणि बागा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हा निर्णय त्या कर्तव्याचा एक भाग म्हणून घेतला गेला आहे.
advertisement
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रकाशात आनंद लुटण्याचा, घरच्यासोबत साजरा करण्याचा उत्सव आहे. पारंपरिक पद्धतीने या रात्री लोक घराबाहेर पडतात. मसाला दूधाचा आस्वाद घेत चांदण्याखाली गप्पा मारत तो क्षण खास बनवतात. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलने आणि हास्यस्पर्धाही आयोजित केल्या जातात. या वातावरणाचा आनंद शहरातील उद्यानांत सर्वांना घेता यावा यासाठी ही विशेष मुभा देण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे कीमउत्सवाचा आनंद घेताना शिस्त, स्वच्छता आणि शांततेचे पालन करावे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ, मोठा आवाज किंवा कचरा टाकणे टाळावे. यासाठी प्रत्येक उद्यान परिसरात स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात राहतील.
कोथरूड, सिंहगड रोड, शिवाजीनगर, बाणेर, नगररोड, पिंपळे सौदागर, हडपसर या परिसरातील प्रमुख उद्याने उशिरापर्यंत खुली राहणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शौचालयांची स्वच्छता यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
या निर्णयाचे पुणेकरांनी स्वागत केले असून अनेकांनी सामाजिक माध्यमांवर महापालिकेचे आभार मानले आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने पुणेकरांना शहरातील हिरवाईत आणि चांदण्यांच्या सान्निध्यात आनंद साजरा करण्याची ही एक खास संधी उपलब्ध झाली आहे.