वाढदिवसाच्या निमित्ताने राजकारणात लॉन्चिंग
ऐन दिवाळीत मुलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मोठे संकेत दिले आहेत. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसंत मोरे यांनी आपल्या लेकाला राजकारणात लॉन्च केलं आहे. 21 ऑक्टोबर हा वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याचा वाढदिवस असतो. अशातच वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणूक बाप नाही तर लेक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
वसंत मोरे यांचं ट्विट काय?
मी जेव्हा 2007 साली पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा तू पहिलीला शाळेत होता. तेव्हापासून सतत 15 वर्ष तुझ्या अंगावर माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल पडलाय पण यावेळी तुझ्या निवडणुकीत माझ्या अंगावर गुलाल पडणारच, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं.
काळभैरवनाथांचीच ईच्छा....
तुझ्या अंगावर गुलाल पडावा ही कात्रजच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचीच ईच्छा आहे. रुपेश वसंत मोरे, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता रुपेश मोरे याला ठाकरे गटाकडून महापालिकेचं तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
पुण्यात निवडणुकीची तयारी जोरदार
दरम्यान, पुण्यात महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार होताना दिसत आहे. पुण्याच्या अनेक भागात दिवाळीच्या निमित्ताने प्रचार देखील सुरू झाला आहे. अनेकांना मोफत कंदिल वाटले जातायेत. तर अनेकांना दिवाळीनिमित्त उठणं, साबण तसेच अनेक वस्तू वाटल्या जात आहेत. त्यामुळे आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.