पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर 15 दिवसांच्या आतच भारत सरकारने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केलीये. दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील 9 तळांवर जोरदार हवाई हल्ला केला. यामध्ये ही लष्करी तळं उद्ध्वस्त झाली असून या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. या कारवाईनंतर पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे म्हणाली, “माझ्या वडिलांसह हल्ल्यात मरण पावलेल्या 26 लोकांना भारत सरकारने खरी श्रद्धांजली दिली आहे, असं आम्हाला वाटतं. ही केवळ सुरुवात आहे. जे दहशतवादी उरले आहेत, त्यांचाही नायनाट व्हावा, अशीच आमची अपेक्षा आहे. केवळ 15 दिवसांत सरकारने ठोस पाऊल उचललं, याबद्दल आम्ही खूपच आभारी आहोत.”
Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीर देखील ताब्यात घ्यावे, ऑपरेशन सिंदूरनंतर जालनाकर काय म्हणाले?
म्हणून सिंदूर नाव दिलं असेल
“या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं, त्यामागे आमच्या भावना आहेत. हल्ल्यात आमच्या साऱ्या भगिनी, लेकींचं कुंकू पुसलं गेलं. म्हणूनच या नावामधून आमच्या वेदनांना जागा दिली गेली असावी,” असंही त्यांनी सांगितलं.
शेवटचा दहशतवादी मारला पाहिजे
संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनीही आपली भावना व्यक्त करत सांगितलं, “रात्री दीड वाजता सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरने आम्हाला सरकारच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या क्षणापासून आम्ही जी वेदना सहन करत आहोत, ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही दहशतवादाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. त्यामुळे आमची एकच मागणी आहे. शेवटचा दहशतवादी मारला गेला पाहिजे आणि भारत देश दहशतवादमुक्त झाला पाहिजे. तेव्हाच खरी श्रद्धांजली अर्पण होईल.”
दरम्यान, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर भारत सरकार आणि सैन्याच्या या कारवाईवर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.





