नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. यावेळी ते हडपसर जवळील एका मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले होते. तेथून जवळच असलेल्या कबुतरांच्या बॉक्सजवळ गेल्यावर कुत्रे भुकू लागल्याने हे दोघे घाबरून पळू लागले. मात्र, हे दोघे कबुतर चोर असल्याचा संशय आल्याने स्थानिक ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला.
advertisement
पळताना रूपेश मुख्य रस्त्यावर खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या संशयितांनी त्याला गाठले आणि लाथाबुक्क्यांसह क्रिकेटच्या बॅटने सपासप वार केले. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रूपेशचा मृत्यू झाला. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी गौरव माजी (२२), सचिन माजी (२३), मोनु माजी (२६) आणि बंटी माजी (१८) या चार सख्ख्या भावांना सायंकाळपर्यंत अटक केली आहे. किरकोळ संशयावरून एका तरुणाचा जीव गेल्याने वैदूवाडी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
