सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत नियमावली आणि मसुदा तयार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी चार कंपन्यांनी परिवहन विभागाकडे परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. मात्र, त्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांना रद्द केले गेले.
कंपन्यांनी सुधारित फेरप्रस्ताव पाठवल्यानंतर संबंधित कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास त्यानंतर तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला जाईल. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतरच कंपन्यांना ॲग्रिग्रेटर परवाना मिळेल आणि पुण्यासह मुंबईत ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू होऊ शकेल.
advertisement
प्रत्येक शहरासाठी रिक्षा, कॅब किंवा बाइक-टॅक्सीचे दर ठरविण्याचे अधिकार त्या शहराच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (आरटीए) आहेत. पुण्यात धावणाऱ्या बाइक टॅक्सीसाठी पुणे आरटीओ कार्यालय विविध बाबींवर विचार करून प्रतिकिलोमीटरचा दर निश्चित करेल. त्यानंतर हा प्रस्ताव 'आरटीए'च्या बैठकीत मांडला जाईल आणि इतर सदस्यांच्या चर्चेनंतर आरटीए अध्यक्ष दराविषयी अंतिम निर्णय घेतील. या दर प्रत्येक शहरासाठी वेगळे असतील.
चार कंपन्यांनी ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. परंतु, प्रस्तावातील त्रुटीमुळे त्यांना फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे. फेरप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होऊ शकते.परंतु, त्यासाठी किती वेळ लागेल हे आतापर्यंत निश्चित करता आलेले नाही. राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी हा पुढील प्रक्रियेचा आवश्यक टप्पा आहे.
