1872 मध्ये स्थापन झालेल्या या सुगंधी पेढीने अगरबत्ती, धूप आणि अत्तर या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासूनच मसाला धूप आणि अगरबत्ती हे या व्यवसायाचे वैशिष्ट्य राहिले आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या अगरबत्त्या आणि अत्तरांमुळे या पेढीची गुणवत्ता आजही तितकीच टिकून आहे. बदलत्या काळानुसार बाजारपेठ बदलली असली, तरी पारंपरिक पद्धती, जुने फॉर्म्युले आणि सुगंध जपण्यावर येथे आजही भर दिला जातो.
advertisement
या पेढीत आजही कस्तुरी, अंबरसह जुन्या पारंपरिक सहा प्रकारच्या अगरबत्त्या उपलब्ध आहेत. तसेच पानडी अगरबत्ती हा येथील आणखी एक वेगळा प्रकार मानला जातो. अत्तरांमध्ये हिना, केवडा, मोगरा, जुई, सोनचाफा, सोन टक्का, सुरण, दवना तसेच पेशवाई अत्तर यांसारख्या पारंपरिक आणि दुर्मिळ सुगंधांचा समावेश आहे. एकेकाळी 1915 साली अगरबत्तीची किंमत अवघी एक आना ते दीड आना होती. आज किंमती वाढल्या असल्या, तरी ग्राहकांची मागणी मात्र तितकीच आहे.
सध्या साधारण एक किलो अगरबत्तीचा दर एक हजार रुपयांपासून पुढे आहे. अगरबत्तीमध्ये एकूण 24 प्रकार उपलब्ध असून, अत्तरांमध्ये तब्बल 500 पेक्षा अधिक व्हरायटी आहेत. विशेष म्हणजे या सुगंधी उत्पादनांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही मोठी मागणी आहे. परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास यांचा संगम साधणारी ही पेढी आजही जुन्या पुण्याच्या ओळखीचा एक सुगंधी भाग ठरत आहे, अशी माहिती देवेंद्र सुगंधी यांनी दिली.