पुणे-नागपूर रेल्वेसेवा ठप्प
पुणे आणि नागपूर दरम्यानचा रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रवास मार्ग मानला जातो. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच वैयक्तिक कामांसाठी अनेकजण या रेल्वेसेवेवर दररोज अवलंबून असतात. पुणे-नागपूर एक्सप्रेस, पुणे-नागपूर हमसाफर एक्सप्रेस आणि पुणे-नागपूर गरिब रथ एक्सप्रेस अशा अनेक गाड्या या मार्गावर धावतात.
advertisement
सध्या दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगचे तांत्रिक काम सुरू असून ते 25 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कामासाठी काही दिवसांसाठी रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागत असल्याने तब्बल 22 दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पाहा संपूर्ण यादी
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुणे-अमरावती एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस, अजनी-पुणे एक्सप्रेस, पुणे-अजनी हमसाफर, अजनी-पुणे हमसाफर तसेच नागपूर-पुणे एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
या कामाचा परिणाम केवळ पुणे-नागपूर मार्गापुरता मर्यादित नसून मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या काही रेल्वे सेवांवरही झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी आणि पर्यायी व्यवस्था पाहावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे
