पुणे : पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला असून पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील नदीकाठच्या परिसरात पाणी शिरलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसलं असून जनजीवन विस्कळीत झालंय. (Pune Rain Red Alert)
advertisement
डेक्कन परिसरातील पुलाचीवाडीतल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे. मुठा नदीकाठच्या नागरी वस्तीला पुराच्या पाण्याचा फटका बसलाय. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरूच आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू आहे. गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
Maharashtra Weather Forecast : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, हवामान विभागाचा रेड अलर्ट
सकाळी 8.00 वाजता वरसगाव धरणाच्या 6395 क्यूसेक विसर्ग वाढ करून सांडवाद्वारे 8327 क्यूसेक विसर्ग व 600 क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण 8927 क्यूसेक विसर्ग चालू करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असं प्रशासनाने सांगितलं आहे.
दरम्यान, पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुराच्या पाण्यात काही ठिकाणी गाड्याही अडकल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. पाटबंधारे विभागाचे नियोजन नसल्यानेच पूर येत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणी सोडण्याचे व्यवस्थित नियोजन करत नसल्यानेच मुठा नदीला दरवेळी हा मानव निर्मित पूर येत असल्याचा आरोप पूलाची वाडी रहिवाशांनी केलाय.
