नाशिक कुंभमेळ्यात विविध ठिकाणी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दोन श्रेयांक (2 क्रेडिट्स) देण्यात येणार आहेत. या निर्णयाची सविस्तर माहिती येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान
कुंभमेळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही लाखो भाविक येत असतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून याठिकाणी काटेकोरपणे नियोजन करावे लागते. या काळात वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, सीसीटीव्ही देखरेख, गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन अशी अनेक कामे असतात. त्यासाठी प्रशासन आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते.
advertisement
पुणे-मुंबईनंतर आणखी एक महामार्ग ठप्प! कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा, काय घडलं?
कुंभमेळ्यातील या कामांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मदत करू शकतात. विद्यार्थ्यांच्या या योगदानाची दखल घेण्यासाठी कुंभमेळ्यात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला होता. या ठरावाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेकडून मान्यता देण्यात आली आहे.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवस्थापन, नियोजन आणि संशोधनाशी संबंधित कामांचा अनुभव मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला आवश्यक ते सहायक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याबाबत आतापर्यंत दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. विद्या परिषदेतही विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
किमान 60 तास सेवा देणे बंधनकारक
विद्यार्थ्यांना ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट या उपक्रमांतर्गत दोन श्रेयांक देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना किमान 60 तास सेवा देणे बंधनकारक असेल. ठरवलेले निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे श्रेयांक दिले जाणार आहेत. तसेच कुंभमेळ्यात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.






