रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत क्लाउड किचनची वाढली डोकेदुखी या संबंधित बातम्या प्रसार माध्यमांमध्ये वारंवार येत असल्याने अखेर प्रशासनाने तत्काळ या बातम्यांकडे लक्ष दिले होते. सांगवी येथील क्लाउड किचनचा परवाना विभागाकडे कोणतीही नोंदणी नव्हती. त्यामुळे महापालिकेने कारवाई करून ते सील केले होते.
दरम्यान या क्लाउड किचनला वारंवार नोटीस दिल्या गेल्या होत्या, तरीही उल्लंघन सुरू होते. महापालिकेच्या पथकाने कारवाईसाठी भेट दिली असता संबंधित दुकानदाराने लोकप्रतिनिधींना फोन करून महापालिका कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांनाही कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता.
advertisement
तथापि महापालिकेच्या पथकाने कारवाई करून किचन सील केले होते. आता ते पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रशासकीय कारवाईवर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. महापालिकेने अनधिकृत क्लाउड किचनधारकांना नोटीस दिल्या होत्या. तसेच सर्व रहिवासी सोसायट्यांमधील क्लाउड किचनचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. अनधिकृत क्लाउड किचनसाठी कारवाई करण्याचा इशारा देखील पालिकेने दिला होता. सांगवी येथील रहिवासी आणि नागरिक आता महापालिकेची तातडीची कारवाई अपेक्षित करत आहेत जेणेकरून अनधिकृत व्यवसायांमुळे समाजात गैरसोय होणार नाही.