नेता की अभिनेता?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना संधी दिली. मतदार संघात फिरले नसल्याचा आरोप करत अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग बांधलेल्या अजित पवारांवर उमेदवार आयात करावा लागला हे इथल्या मतदारांना पटलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजी आढळरावांना घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची 'वेळ' अजित पवारांवर आली. मग सुरू झाली, ती आव्हान-प्रतिआव्हानांची लढाई. आधी अजित पवारांचं मग शिवाजी आढळरावांचं आव्हान कोल्हेंनी स्वीकारलं.
advertisement
आढळरावांच्या कंपनीशी संदर्भात केलेले आरोप आणि पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान, कोल्हेंनी पुराव्यानिशी जनतेसमोर मांडले. लोकसभा निवडणुकीतून बाहेर पडण्याचा दिलेला शब्द आढळरावांनी पाळावा. याची कोल्हेंनी आठवणही करून दिली. मात्र, झालेले आरोप आणि सादर केलेल्या पुराव्यांचा माझ्या कंपनीशी संबंध नसल्याचा आढळरावांनी पलटवार केला. पुढं जाऊन याचं रूपांतर सरड्याची अन् पोपटाची उपमा देण्यापर्यंत गेली. स्थानिक मुद्दे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रखडलेला विकास हा मार्गी लावण्यासाठी नेता हवा की अभिनेता अशी फटकेबाजी ही झाली होती.
शिरूर लोकसभेतील विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
विधानसभा 2024 2019
जुन्नर 58.16% 64.65%
आंबेगाव 62.95% 70.13%
खेड-आळंदी 57.76% 62.20%
शिरूर 56.91% 61.45%
हडपसर 49.41% 57.45%
भोसरी 47.71% 47.84%
राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी. नेत्यांनी सोडलेली तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान पाहून मतदारांचा राजकारण्यांवरील उडालेला विश्वास, सोबतचं शिरूर लोकसभेतील उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय, यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाल होतं. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आलं. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धडधड वाढली होती.
वाचा - मनोज जरांगे इज ब्रँड, पंकजा मुंडेंना बीडमध्ये बसला फटका, नेमकं काय घडलं?
2019 साली काय परिस्थिती होती?
शिरूर लोकसभेतील 6 विधानसभांमध्ये 2019 साली आणि यंदा मतदानाच्या टक्केवारीत चांगलाच बदल झालाय. अमोल कोल्हेंना 2019 साली जुन्नर विधानसभेतून 41 हजार 551 मतांची आघाडी मिळाली होती. पण यंदा जुन्नर विधानसभेत 6.49 टक्के मतदान कमी झालंय. आढळरावांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगावमधून 25 हजार 697 अधिकची मतं कोल्हेंना मिळाली होती. पण यंदा इथून 7.18 टक्क्यांनी मतदान घटलंय. खेड-आळंदी विधानसभेत ही 7 हजार 446 मतांचं कोल्हेंना लीड होतं. तिथं ही 4.44 टक्क्यांची घसरण आहे. तसेच शिरूर विधानसभेतून ही 26 हजार 305 मतांनी कोल्हेंची आगेकूच कायम होती. पण इथं ही यंदा 4.54 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. भोसरी आणि हडपसरमध्ये शिवाजी आढळरावांना 37 हजार 77 आणि 5 हजार 370 मतांची आघाडी होती. मात्र, या विधानसभांपैकी हडपसरमध्ये 8 टक्के मतांची टक्केवारी खालावली. फक्त भोसरी विधानसभेत अवघं 0.13 टक्के इतकीच मतं कमी झालं.
टक्का घसरला, फायदा कोणाला?
मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते, असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. मागच्या वेळी कोल्हेंना निवडून आणणारी मंडळी यावेळी आढळराव यांचा प्रचार करत होती तर आढळरावांची ताकत असलेले पारंपारिक शिवसैनिक मात्र कोल्हेच्या बाजूने होते. त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अपघातामुळे मतदार संघात फिरले नाही. त्याचाही कोल्हे ना फायदा झाला.