वाढते वैद्यकीय खर्च, तपासण्या, औषधे आणि प्रसूतीदरम्यान येणारा मोठा खर्च यामुळे अनेक महिलांना योग्य वेळी उपचार घेणे शक्य होत नाही. विशेषतः झोपडपट्टी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ भागांमध्ये राहणाऱ्या महिलांना गर्भधारणा लक्षात येण्यास उशीर होतो आणि त्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन स्मिता पाटील यांनी 2024 मध्ये सखी सुविधा वुमन वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना केली.
advertisement
Holi Tradition: धुंड संस्कार अन् हजारो वर्षांची परंपरा, कशी असते बंजारा समाजाची पारंपरिक होळी? Video
गेल्या 20 वर्षांपासून त्या कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबल्सच्या एक्स्पोर्टचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी कामासाठी येणाऱ्या काही महिलांना गर्भावस्थेत आलेल्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. काही महिलांना आर्थिक अडचणींमुळे योग्य तपासण्या करता येत नव्हत्या. तेव्हा त्यांना वैयक्तिक पातळीवर मदत केली. मात्र, केवळ तात्पुरती मदत न करता दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा विचार त्यांनी केला.
रक्तदान शिबिरे, डोळे आणि दात तपासणी शिबिरे यांसारखे उपक्रम समाजात होत असले तरी गर्भावस्थेपासून बाळाच्या पहिल्या वर्षापर्यंत सातत्याने साथ देणारा उपक्रम कमी प्रमाणात दिसतो, असे त्यांचे मत आहे. डॉक्टर आणि गायनॅकॉलॉजिस्ट यांच्याशी चर्चा करताना त्यांना जाणवले की अनेक महिलांना चौथ्या महिन्यापर्यंत आपण गर्भवती आहोत हे समजत नाही. त्यामुळे पुढील उपचारात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यावर उपाय म्हणून त्यांनी लवकर निदान, नियमित तपासण्या आणि सुरक्षित प्रसूती यावर भर देणारी योजना सुरू केली.
या उपक्रमांतर्गत कोथरूडमधील झोपडपट्टी भागातील महिलांची गर्भधारणा ओळखल्यापासून ते प्रसूतीपर्यंत आणि बाळ सहा महिने ते एक वर्षाचे होईपर्यंत सर्व वैद्यकीय जबाबदारी फाउंडेशन उचलते. घरातील बहीण किंवा मुलीसाठी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी या महिलांसाठी घेतली जाते. गेल्या वर्षभरात 800 हून अधिक महिलांना मदत करण्यात आली आहे. तसेच आठव्या महिन्यानंतर संपर्कात आलेल्या सुमारे 350 महिलांचा त्यांच्या सुरू असलेल्या रुग्णालयातच संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे.
या सर्व सेवांसाठी महिलांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी झाला, तर तिचे पुढील आयुष्यही अधिक सक्षम होऊ शकते, असे स्मिता पाटील यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत मातृत्वाच्या प्रवासात हजारो महिलांना आधार देणारा हा उपक्रम सध्या पुण्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.





