ही घटना गुरुवारी दुपारी घडली. तानाजी पायगुडे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. तर सचिन तानाजी पायगुडे असं हल्लेखोर मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा हा कोथरूड परिसरातील जय भवानी नगरमधील चाळ क्रमांक दोनमध्ये आपल्या आई वडिलांसह वास्तव्याला आहे. घटनेच्या दिवशी टीव्ही बंद करण्याच्या कारणातून बापलेकामध्ये वाद झाला. याच वादातून ही हत्येची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
संपूर्ण घटना काय आहे?
दसऱ्याच्या दिवशी दुपारी साधारण बारा वाजता आरोपी मुलगा सचिन आपल्या घरात टीव्ही पाहात बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला "टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक" असं सांगितले. वडिलांच्या या बोलण्यावरून बापलेकात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि राग अनावर झाल्यानंतर सचिनने क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरातील चाकू उचलला. त्याने थेट वडिलांच्या तोंड आणि गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तानाजी पायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे याला ताब्यात घेतले आहे. मयत तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिनवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन दसऱ्याच्या दिवशी मुलाने अशाप्रकारे आपल्या वडिलांची हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.