पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतोय अशी घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरे नेमका कसा प्रचार करणार हे अजुन गुलदस्त्यात आहे. पण अशातच अमित ठाकरेंबद्दल एक बातमी व्हायरल झाली आहे. पण राज ठाकरेंनी ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ट्वीट करून एका बातमीचं खंडन केलं आहे. काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही, असा खुलासा राज ठाकरेंनी केला आहे.
advertisement
'अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
'अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असो. सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं, अशी विनंतीही राज ठाकरेंनी केली.