पिंपरी-चिंचवडमध्ये काही दृष्टीहीन मुलं राख्या बनवून आपलं शिक्षण आणि उदरनिर्वाह करत आहेत. या मुलांनी तयार केलेल्या राख्यांना देशासह परदेशातही मागणी आहे. 'आस्था राखी'चे संस्थापक पराग कुकंलर यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो दिव्यांग आणि दृष्टीहीनांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे.
advertisement
पिंपरी-चिंचवडमधील 'आस्था राखी' या उपक्रमातून गेल्या 25 वर्षांपासून दृष्टीहीन आणि दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळवून दिला जात आहे. संस्थापक पराग कुकंलर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या सामाजिक उपक्रमामुळे हजारो दिव्यांगांच्या हाताला काम मिळालं आहे. या राख्यांच्या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृती देखील केली जात आहे.
प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या एक महिना अगोदर या मुलांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात दोरा ओवणे, मणी लावणे, नक्षी लावणे अशा क्रिया शिकवल्या जातात, अशी माहिती पराग कुकंलर यांनी दिली.
'माझ्याकडे अमूक एक गोष्ट नव्हती म्हणून मला काम जमलं नाही,' असं आपण अनेकदा म्हणतो. पिंपरी-चिंचवडमधील ही दृष्टीहीन मुलं मात्र, कोणतीही तक्रार न करता पैसे कमवत आहेत. 'स्वतःच्या पायावर उभं राहायचं' हा निर्धार घेऊन ही मुलं प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत. प्रत्येक राखी ते स्वतःच्या हाताने तयार करतात. दोरा ओवणे, मणी लावणे, नक्षी चिकटवणे ही सगळी कामं ते आत्मविश्वासाने करतात.