भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणामुळे गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, स्थानकांची मर्यादित क्षमता आणि वाढता प्रवासी ताण लक्षात घेता अनेकदा फलाटांवर आणि गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वॉर रूम सुरू करण्यात आली असून, यामध्ये 24 तास कार्यरत असणारे 10 कर्मचारी प्रवाशांच्या तक्रारींवर लक्ष ठेवत आहेत.
advertisement
या वॉर रूममध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रवाशांनी तक्रार केली की ती तत्काळ संबंधित विभागापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर वीस मिनिटांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केली जाते. या प्रक्रियेमुळे प्रवाशांना त्वरित प्रतिसाद मिळत असून, प्रवासातील अडचणी कमी होत आहेत.
प्रवाशांकडून सर्वाधिक तक्रारी गाड्यांतील फॅन, दिवे, चार्जिंग पॉईंट बंद असणे, स्वच्छतेचा अभाव, बेडरोल खराब असणे, स्वच्छतागृहात पाणी नसणे, गाडी विलंब, सहप्रवाशाचे गैरवर्तन, अशा विषयांवर येतात. या तक्रारी रेल मदत अॅप, तसेच रेल्वेच्या ‘एक्स’वरील अधिकृत हँडलवरून केल्या जातात.
सण-उत्सवांच्या काळात पुणे स्थानकातून सुमारे दीड लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. त्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षा जवानांची नेमणूक करून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाते. गाड्या फलाटावर येण्यापूर्वीच प्रवाशांना सूचना दिल्या जातात, ज्यामुळे गोंधळ आणि ढकलाढकलीची शक्यता कमी झाली आहे.
पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे यांनी सांगितले, वॉर रूममुळे केवळ तक्रारींचे त्वरित निराकरण होत नाही, तर प्रवासी सुरक्षेचे आणि सोयींचेही नियमन शक्य झाले आहे. एखाद्या प्रवाशाचे साहित्य हरवल्यासही काही मिनिटांत शोध घेऊन मदत दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे पुणे रेल्वे स्थानकाचा प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर बनत आहे. भारतीय रेल्वेच्या या प्रयोगाची लवकरच इतर मोठ्या स्थानकांवरही अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
