पुणे: एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आस्मानी संकटाने हैराण केले. कुठं वादळी पाऊस, तर कुठं गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.आता पुन्हा हवापालट होणार असून पुढील आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या आठवड्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. सानप यांनी माहिती दिलीये.
advertisement
एप्रिल सर्वाधिक हॉट
देशात सरासरी तापमानाची पातळी वाढत आहे. नुकतेच गुजरातमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. महाराष्ट्रात देखील येत्या आठवड्यात तापमानाचा पारा चढण्याची शक्यता असून काही ठिकाणी उष्मतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात. मार्च महिना गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता. त्याचप्रमाणेच एप्रिलमध्ये देखील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.
आजचं हवामान: राज्यावर पुन्हा नवं संकट, विदर्भाला मात्र वेगळाच अलर्ट
उष्णतेच्या लाटांचा इशारा
मागील आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते. तसेच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमान सरासरी पेक्षा कमी होते. मात्र आता हवापालट होणार असून तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. पुढील दोन दिवसांचा विचार केला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी फारसं तापमान राहणार नाही. त्यानंतर मात्र तापमान सरासरी पेक्षा दोन अंशांनी जास्त राहणार आहे. उष्णतेचा पारा 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होईल, असं सानप यांनी सांगितले.
नागरिकांनी काळजी घ्यावी
राज्यात येत्या आठवड्यात उष्णता सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेड ठेवावे. या काळात हलके आणि सुतासारखे कपडे परिधान करावेत, असं आवाहनही करण्यात आलंय.





