आजचं हवामान: राज्यावर पुन्हा नवं संकट, विदर्भाला मात्र वेगळाच अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Forecast Today: एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यावर अवकाळी संकट घोंघावत होतं. आता पुन्हा हवापालट होण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
पुणे: एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत असून काही ठिकाणी वादळी पाऊस तर कुठे गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता पुन्हा उष्णतेचा पारा चढण्याची चिन्हे आहेत. शनिवारी, 5 एप्रिल रोजी राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाळ्याचा प्रभाव वाढत असून, काही भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर कोकणात दमट हवामान नागरिकांना हैराण करेल.
advertisement
इथं सर्वाधिक तापमान
मुंबईत शनिवारी कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस राहील, पण आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. पुण्यात सकाळी गारवा असला तरी दुपारपर्यंत तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये उष्णतेचा जोर वाढेल. उपराजधानीत तापमान 42 अंशांपर्यंत नोंदवलं जाऊ शकतं. विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा ही शहरेही 43 अंशांपर्यंत तापतील, ज्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये 37 अंश आणि औरंगाबादेत 39 अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आहे.
advertisement
पावसाची शक्यता कमी
राज्यात काही ठिकाणी तुरळक ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता फारच कमी आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात समुद्रकिनारी वारे वाहतील, तरीही दमटपणामुळे त्रास होऊ शकतो. दरम्यान, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाणी आणि हलके कपडे यांचा वापर वाढवून उष्माघात टाळावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
नागरिकांनी काळजी घ्यावी
view commentsहवामानातील बदलांचा परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर आणि पुण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यंदाचा उन्हाळा तीव्र ठरण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी सावध राहावं, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 04, 2025 8:58 PM IST

