जालना शहरातील अनोखा गणेश मंडळ दरवर्षी नावाप्रमाणे वेगवेगळे अनोखे प्रकार करत असते. दोन वर्षांपूर्वी या गणेश मंडळाने 108 किलो चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सगळ्यांचेच लक्ष वेधले. मागील वर्षी या मूर्तीला सोन्याने आभूषित करण्यात आले होते. तर यंदा तब्बल 2 कोटी रुपयांचे सोनं या गणेश मूर्तीवर लावण्यात आले.
advertisement
जालना शहराच्या बाबतीत जालना सोन्याचा पाळणा असं म्हटलं जातं. स्टील, बियाणे आणि इतर लहान-मोठ्या उद्योगांमुळे अशी बिरुदावली शहराला लाभली आहे. याच बिरुदावलीचा प्रत्यय जालनाकरांना दरवर्षीच येतो. अनोखा गणेश मंडळाने तब्बल 2 कोटींचं सोनं आपल्या गणेश मूर्तीवर घालून जालनाच्या श्रीमंतीचं उदाहरण पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
दरवर्षी आम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. गणेश भक्तांनाही यामध्ये मोठी रुची असते. मागील काही वर्षांमध्ये आम्ही हरियाणा येथील कलाकारांकडून रामायण, उडणारे हनुमान, शिवतांडव नृत्य अशा पद्धतीचे देखावे सादर केले. त्याच पद्धतीने तब्बल सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करणारे जालना शहरातील हे एकमेव मंडळ आहे. यंदा आम्ही गणेश मूर्तीवर सोनं चढवले असून पुढील वर्षी सगळ्यांच्या आशीर्वादाने गणेश मूर्तीला हिऱ्यांनी मढवण्यात येणार आहे. गणपतीचे भव्य मंदिर देखील प्रस्तावित आहे, असं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भरतीया यांनी सांगितलं.