कोल्हापूर : चातुर्मासातील शेवटचा मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सण आणि उत्सव अशा दोन्ही स्वरुपात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी वसुबारस ते कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, गोवत्स द्वादशीनंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी महत्त्वही अनन्य साधारण आहे. यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत तसेच मुहूर्ताबाबत संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. लक्ष्मीपूजन नेमके कधी करावे? लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी कोल्हापुरातील मंदिर आणि शास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिलीये.
advertisement
हिंदू धर्मानुसार दरवर्षी आश्विन महिन्याच्या चतुर्दशीला छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे 16 हजार स्त्रियांची मुक्तता केली, असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस दीप प्रज्वलन करून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी लोक यमदेवासाठी दिवा लावून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का करतात झाडूची पूजा? पाहा शास्त्र काय सांगतं?
दिवाळीला 28 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. 28 ऑक्टोबर रोजी वसुबारस, 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, 2 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा तर 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. यंदा मात्र लक्ष्मीपूजन अमावास्या प्रदोषात असताना सांगितले असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांत फिरत आहेत. नेमके लक्ष्मीपूजन कधी करावे, याबाबत धर्मशास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया...
अश्विन अमावास्या प्रारंभ, सांगता आणि लक्ष्मीपूजन
31 ऑक्टोबर रोजी चतुर्दशी समाप्ती दुपारी 3 वाजून 53 वाजता होत असून, त्यानंतर अमावास्या सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 01 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 17 वाजता अमावास्या समाप्त होत आहे. 31 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची अधिक व्याप्ती असून, दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबर रोजी अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असताना लक्ष्मीपूजन सांगितले आहे. त्यामुळेच संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सूर्यास्त समयी प्रदोष काळात स्पर्श असलेली अमावास्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोष काळात असलेल्या तसेच प्रतिपदायुक्त अशा अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे फलदायी असते, असे मानले जाते.
लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा का केली जाते, अलक्ष्मी कोण, नेमकी काय आहे यामागची कथा?
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त केव्हा ?
लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त 1 नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असली, तरी सायंकाळपासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटे तसेच सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजून 35 आणि रात्री 9 वाजून 10 मिनिटांपासून ते 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत मुहूर्त सांगितले आहेत.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करू नये?
नरक चतुर्दशीला मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करू नये. यासोबत घराची दक्षिण दिशा अस्वच्छ करू नये.
नरक चतुर्दशीला कोणाची पूजा करतात?
नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.