किंक्रांत म्हणजे काय? (What Is Kinkrant)
पौराणिक कथांनुसार, संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी 'संक्रासूर' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मात्र, त्यानंतरही त्याच्या सैन्यातील 'किंकर' नावाचा अत्यंत क्रूर राक्षस जिवंत होता. या राक्षसाने ऋषीमुनींना आणि सर्वसामान्यांना प्रचंड त्रास दिला. अखेर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने 'किंक्रांत' हे उग्र रूप धारण करून या किंकरासुराचा नाश केला. देवीने जरी राक्षसाचा वध केला असला, तरी हा काळ युद्धाचा आणि संहारक शक्तींचा मानला जातो. यादरम्यान वातावरणात नकारात्मक लहरींचे प्राबल्य जास्त असते. म्हणूनच या दिवसाला 'करिदिन' असेही म्हणतात. या काळात नवीन कार्याचा श्रीगणेशा करणे फलदायी ठरत नाही, अशी पूर्वापार धारणा आहे.
advertisement
या दिवशी शुभ कामांना बंदी, पण 'ही' दोन कार्ये कराच…
वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार, जरी हा दिवस अशुभ असला तरी 'देवाची आराधना' आणि 'बोरन्हाण' या दोन गोष्टी केल्यास आयुष्यातील संकटे दूर होतात.
देवाची आराधना आणि नामस्मरण
किंक्रांतीच्या दिवशी वातावरणातील रज-तम लहरी वाढलेल्या असतात. या लहरींचा आपल्या मनावर आणि आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून या दिवशी जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना करावी. या दिवशी कुलदेवतेचा जप किंवा हनुमान चालीसा वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हे दिवस 'शक्ती' उपासनेसाठी उत्तम मानले जातात, कारण याच दिवशी देवीने विजय मिळवला होता. त्यामुळे देवीची उपासना केल्याने शत्रूवर विजय मिळवण्याचे बळ प्राप्त होते.
लहान मुलांचे 'बोरन्हाण'
अनेक पालकांना प्रश्न पडतो की, जर हा दिवस अशुभ आहे तर मुलांचे बोरन्हाण याच दिवशी का करावे?
लहान मुले अत्यंत कोमल असतात आणि त्यांना वाईट दृष्ट लवकर लागते. किंकरासुराच्या संहारक शक्तींचा मुलांवर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांना 'बोरन्हाण' घालून त्यांचे रक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, चॉकलेट्स आणि कुरमुरे मुलांच्या डोक्यावरून ओतले जातात. मुले जेव्हा हे पदार्थ वेचतात, तेव्हा त्यांच्यातील नकारात्मकता दूर होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे.
किंक्रांत हा दिवस भीतीचा नसून सावधगिरीचा आहे. या दिवशी नवीन शुभ कामे जरी आपण करत नसलो, तरी भक्ती आणि परंपरेच्या माध्यमातून आपण स्वतःभोवती एक संरक्षक कवच निर्माण करू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
