यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळे पौराणिक कथांवर आधारित देखावे साकारत आहेत, तर काही मंडळे सामाजिक, राष्ट्रीय आणि समकालीन विषयांना अधोरेखित करणार आहेत. मात्र जुन्या आणि प्रतिष्ठित मंडळांपैकी एक असणारे हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ यंदा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. कारण या मंडळाकडून यंदा दक्षिण भारतातील जगप्रसिद्ध म्हैसूर पॅलेसची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: याला म्हणतात परंपरा आणि व्यवसायाची सांगड, पुण्यात इथं बनतात लाखो मोदक
म्हैसूर पॅलेस हा भारतातील ऐतिहासिक आणि कलात्मक वैभवाचे प्रतीक मानला जातो. या पॅलेसच्या हुबेहूब प्रतिकृतीमुळे पुणेकरांना म्हैसूरच्या राजेशाही परंपरेचा अनुभव घरबसल्या घेता येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या देखाव्याची तयारी दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. दोन महिने स्टुडिओमध्ये डिझाइनिंग आणि स्ट्रक्चर तयार करण्याचे काम झाले, तर गेल्या महिन्याभरात स्थळावर सजावट आणि लाइटिंगसह अंतिम काम सुरू आहे.
गेली अनेक वर्षे आमचे मंडळ विविध मंदिरांवर आधारित देखावे साकारत होते. मात्र यंदा काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि म्हैसूर पॅलेसची कल्पना प्रत्यक्षात आणली. पॅलेसचा प्रत्येक बारकावा अचूकपणे जुळविण्यासाठी आम्ही अनुभवी कलाकारांची मदत घेतली आहे, असे मारणे यांनी सांगितले.
हा देखावा साकारण्यासाठी एकूण 70 ते 80 कुशल कारागीर, रंगकाम करणारे, लाइटिंग तज्ज्ञ आणि डिझायनर्स काम करत आहेत. संपूर्ण देखाव्यासाठी तीन महिने अविरत परिश्रम घेतले गेले आहेत. या देखाव्याचे डिझाईन प्रसिद्ध कलादिग्दर्शक कै. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या सहकारी हेमंत भाटकर यांनी केले आहे. त्यामुळे कलात्मकतेत कुठलीही तडजोड न करता हा राजेशाही देखावा भाविकांसमोर साकारला जाणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू मंडळ हे 56 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याची परंपरा या मंडळाची आहे. या आधीही या मंडळाने अनेक चित्रपटांच्या सेटवर आधारित देखावे साकारले आहेत, ज्यांना पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाही हा देखावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या काळात या देखाव्याला मोठ्या प्रमाणात भाविक भेट देणार असल्याची अपेक्षा आहे. सुंदर प्रकाशयोजना, बारकाईने केलेले डेकोरेशन आणि म्हैसूरच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी ही प्रतिकृती पुणेकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. पुणेकरांनी या भव्य देखाव्याचा आनंद घ्यायचा असल्यास, गणेशोत्सवाच्या दरम्यान हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाला नक्की भेट द्यावी.





