मुंबई : श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. दरम्यान या नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास ही केला जातो. मात्र, यामागे नक्की काय कारण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नसते. याबद्दच आपल्याला पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा सण नागपंचमी. यावर्षी नागपंचमी शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल. नागपंचमीच्या दिवशी शेतात सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंगदेखील आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो तसेच काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते. तसेच नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो, असं सुरज म्हशेळकर सांगतात.
तब्बल 6 वर्षांनी नागपंचमीला जुळून येतील 3 दुर्मीळ योग, मग सुरू होईल 4 राशींचा सुवर्ण काळ...
नागपंचमीच्या दिवशी भावासाठी का करतात उपवास?
नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील आहे. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि उपवास करू लागल्या, असं सुरज म्हशेळकर सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





