पापमोचनी एकादशीचे महत्त्व - पद्म पुराणात पापमोचनी एकादशीचे वर्णन मिळते. या पुराणातील माहितीनुसार, या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती आपल्या केलेल्या पापांतून मुक्त होऊ शकते, म्हणूनच याला पापांचा नाश करणारी एकादशी म्हणतात. चुकीच्या केलेल्या गोष्टींसाठी मनापासून क्षमा मागून या दिवशी खऱ्या मनाने व्रत आणि श्रीहरींची पूजा केल्याने व्यक्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी झालेल्या चुकांतून मुक्ती मिळते. हे व्रत मन आणि आत्मा शुद्ध करण्याची संधी देते. पुराणात सांगितले आहे की, या व्रतामुळे व्यक्ती जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन वैकुंठ धामात स्थान मिळवते.
advertisement
पापमोचनी एकादशी 2026 -
एकादशी तिथीची सुरुवात - 14 मार्च, सकाळी 08 वाजून 10 मिनिटांनी
एकादशी तिथीची समाप्ती - 15 मार्च, सकाळी 09 वाजून 16 मिनिटांपर्यंत
उदयातिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत 15 मार्च म्हणजेच आज केले जात आहे.
व्रत सोडण्याची वेळ: 16 मार्च, सकाळी 06 वाजून 30 मिनिटे ते 08 वाजून 54 मिनिटांपर्यंत.
पापमोचनी एकादशी शुभ योग - आज एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग आणि शुक्र उच्च राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच मीन राशीत शुक्र, शनी आणि सूर्य एकत्र असल्याने शुक्रादित्य योग आणि त्रिग्रही योग तयार होत आहेत. या शुभ लोकांमुळे आजच्या तिथीचे महत्त्व खूप वाढले आहे.
पूजन मुहूर्त - सकाळी 8 ते 9 वाजून 30 मिनिटांपर्यंत आणि सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते 11 वाजेपर्यंत
बहुप्रतिक्षित गुडन्यूज येणार! 16 मार्चला महालक्ष्मी राजयोग जुळला; 3 राशींचे दिवस पालटणार
पापमोचनी एकादशी पूजा विधी - सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यावर हातात अक्षता आणि फूल घेऊन भगवान श्रीहरींचे ध्यान करत व्रताचा संकल्प करा. त्यानंतर देव्हाऱ्यात विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून पूजेला सुरुवात करा. पूजेत देवाला चंदन, अक्षता, पिवळी फुले, तुळशीचे पान, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, गीता पाठ किंवा देवाच्या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. व्रत करणारे लोक आज दिवसभर फलाहार करतात. संध्याकाळी आरती करून भजन-कीर्तन केले जाते. गरजू लोकांना दान देणे या दिवशी खूप पुण्य देणारे मानले जाते. एकादशीच्या रात्री जागरण करणेही लाभदायक असते. दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना दान-दक्षिणा दिल्यावर व्रत सोडले जाते.
पापमोचनी एकादशी व्रत कथा - ब्रह्मदेवांनी नारद मुनींना ही कथा सांगितली होती. त्यानुसार, चित्ररथ वनात इंद्र आणि गंधर्व कन्या फिरायला जात असत. त्याच वनात मेधावी ऋषी भगवान शिवशंकरांची तपस्या करत होते. ते ब्रह्मचर्याचे पालन करत कठोर तपश्चर्या करत होते. एक दिवस तिथे मंजुघोषा नावाची अप्सरा आली आणि ऋषींच्या आश्रमाजवळ वीणा वाजवून गाणी गाऊ लागली. तिच्या गाण्यामुळे ऋषींचे ध्यान भंग पावले आणि ते तिच्यावर मोहित झाले. ते आपले ध्येय विसरले आणि मंजुघोषेसोबत काळ घालवू लागले. असे करत 57 वर्षे निघून गेली.
उजव्या हाताचा अंगठा नीट पाहा, अशी दोन चिन्ह त्यावर असल्यास ताबडतोब...
एका दिवस मंजुघोषेने ऋषींकडे स्वर्गलोकात जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा ऋषींना आपल्या चुकीची जाणीव झाली. आपल्या तपश्चर्येत अडथळा आणल्यामुळे त्यांनी क्रोधात येऊन मंजुघोषेला पिशाचनी होण्याचा शाप दिला. मंजुघोषा घाबरली आणि तिने शापमुक्तीचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी तिला फाल्गुन कृष्ण एकादशीचे व्रत आणि विष्णूची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर ऋषी आपल्या वडिलांकडे गेले, तेव्हा वडिलांनीही त्यांना हेच व्रत करण्याचा सल्ला दिला. दोघांनीही विधीपूर्वक व्रत केले आणि श्रीहरींच्या आशीर्वादाने मंजुघोषा शापमुक्त होऊन स्वर्गात गेली, तर मेधावी ऋषी सुद्धा पापमुक्त झाले. जो कोणी हे व्रत करतो, त्याचे सर्व पाप मिटतात आणि त्याला पुण्याची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
