नवस म्हणजे काय?
नवस हा देव आणि भक्त यांच्यातील एक 'संकल्प' असतो. जेव्हा आपण म्हणतो की "माझे हे काम झाले तर मी अमुक एक गोष्ट करेन," तेव्हा आपण आपल्या मनाची शक्ती त्या कार्यासाठी केंद्रित करतो. शास्त्रानुसार, नवस हा श्रद्धेचा भाग आहे, व्यापाराचा नाही. देवाला तुमच्या वस्तूची गरज नसते, तर तुमच्या 'शब्दाची' आणि 'प्रामाणिकपणाची' गरज असते.
advertisement
नवस न फेडल्यास होणारे परिणाम
मानसिक अशांतता: पंडितांच्या मते, नवस न फेडल्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या मनावर होतो. "मी देवाला वचन दिले होते आणि ते पाळले नाही," हा विचार मनात सतत घोळत राहिल्याने नकारात्मकता वाढते. यामुळे कामात लक्ष लागत नाही आणि मनामध्ये भीती निर्माण होते.
कामात अडथळे: ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल आणि तुम्ही जाणीवपूर्वक नवस टाळत असाल, तर तुमच्या पुढील कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. हे देवाच्या कोपामुळे नसून, तुमच्या तुटलेल्या संकल्पशक्तीमुळे घडते.
दोष आणि पितृदोष: काही ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, जर कुलदेवतेला केलेला नवस पिढ्यानपिढ्या प्रलंबित राहिला, तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या प्रगतीवर होऊ शकतो. याला 'कुलदोष' असेही संबोधले जाते.
नवस फेडायला उशीर झाला तर काय करावे?
अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अंतर जास्त असल्याने नवस वेळेवर फेडता येत नाही. अशा वेळी घाबरून जाण्याचे कारण नाही. जवळच्या मंदिरात जाऊन किंवा घरातील देव्हाऱ्यासमोर दिवा लावून देवाची मनापासून माफी मागा. जर मूळ नवस फेडणे अशक्य असेल, तर पंडितांच्या सल्ल्याने तेवढ्याच मूल्याचे धान्य किंवा अन्नदान गरिबांना करा. देवाला सांगा की, "परिस्थिती अनुकूल होताच मी माझा नवस पूर्ण करेन." देव हा भावाचा भुकेला असतो, त्यामुळे तुमची ओढ खरी असेल तर तो दोष मानत नाही.
देव हा पित्यासमान असतो. जसा बाप आपल्या मुलाच्या चुका पोटात घालतो, तसाच देवही केवळ नवस न फेडल्याने तुमच्यावर कोपत नाही. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे माणसाच्या उत्तम चरित्राचे लक्षण आहे. त्यामुळे विसरलेला नवस आठवताच तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
