किंक्रांत म्हणजे काय?
मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने 'संक्रासूर' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मात्र, त्यानंतरही 'किंकर' नावाचा एक भयानक राक्षस शिल्लक होता, जो लोकांना छळत होता. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने 'देवी किंक्रांत' हे रूप धारण करून या किंकर राक्षसाचा संहार केला. या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस 'किंक्रांत' म्हणून ओळखला जातो. देवीने राक्षसाचा वध केला असला तरी, हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला 'करदिन' किंवा अशुभ काळ मानले जाते.
advertisement
संक्रांतीला भरलेल्या बांगड्या का काढू नये?
संक्रांतीच्या दिवशी महिला सुवासिनींना वाण देतात आणि नवीन बांगड्या भरतात. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. किंक्रांत हा दिवस युद्धाचा आणि संहारक शक्तीचा असल्याने या दिवशी नवीन बांगड्या फोडणे किंवा काढणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता वाढू शकते, अशी धारणा आहे.
चुकूनही केस का धू नये?
शास्त्रात किंक्रांतीला 'अमंगळ' मानले जाते. या दिवशी केस धुणे, नखे काढणे किंवा क्षौरकर्म करणे टाळावे. असे मानले जाते की, या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्तीशी जोडली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो किंवा मानसिक ताण वाढू शकतो.
लांबचा प्रवास का टाळावा?
किंक्रांतीला 'करदिन' म्हटले जाते. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात. अपघातांची शक्यता किंवा प्रवासात अडथळे येऊ नयेत, म्हणून जुन्या काळापासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो.
'या' शुभ गोष्टी टाळा…
किंक्रांत म्हणजे 'विनाशाचा अंत' असला तरी, तो दिवस सुतकासारखा पाळला जातो. नवीन घर खरेदी, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते, असे मानले जाते. जर या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर तसे करणे चुकीचे ठरेल. अगदी या दिवशी हळदी-कुंकू देखील करू नये.
लहान मुलांचे 'बोरन्हाण' याच दिवशी का करावे?
बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला किंवा प्रामुख्याने किंक्रांतीला लहान मुलांचे 'बोरन्हाण' केले जाते. यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. थंडीच्या दिवसांत लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना बोरं, ऊस, हरभरे, आणि चुरमुरे याने न्हाऊ घातले जाते. या प्रक्रियेत मुले हे पदार्थ आनंदाने खातात. किंक्रांतीच्या नकारात्मक प्रभावापासून लहान मुलांचे रक्षण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. तसेच अध्यात्मिक कारण म्हणजे, याच दिवशी जर लहान मुलांचं बोरन्हाण केलं तर मुलांची चिडचिड, किरकिर कमी होते असे मानले जाते.
किंक्रांतीला आवर्जून करावं 'हे' एक काम
किंक्रांत हा जरी अशुभ मानला जात असला तरी, या दिवशी 'कुलदेवतेची उपासना' आणि 'दान' करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः या दिवशी तीळ आणि गुळाचे दान गरिबांना करावे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे 'किंकर' शक्तींचा घरातील प्रवेश रोखला जातो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
