घोटा परंपरेच्या माध्यमातून बंजारा समाज आपल्या सांस्कृतिक वारशाचा जागर करत असतो. लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवर नववधू आणि वराच्या कुटुंबीयांमध्ये एक वेगळीच उत्सवाची रंगत दिसून येते. या परंपरेमध्ये नवरदेव आपल्या घरीपासून नवरीच्या घरी मिरवणूक काढतो. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, बंजारा वेशभूषेत रंगलेली मंडळी, गाणी-नृत्ये यांचा संगम पाहायला मिळतो, असं भारत राठोड सांगतात.
advertisement
हनुमान चालीसा नियमित का वाचावी? नीम करोली बाबांनी सांगितले होते प्रभावशाली महत्व
नवरदेव नवरीच्या घरी निघण्यापूर्वी मानाचा एक रुपया समाजातील नाईकाला अर्पण केला जातो. नाईक ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असते. या एका रुपयामध्ये नवरदेवाच्या कुटुंबाकडून समाजातील वडीलधाऱ्यांप्रती सन्मान व्यक्त केला जातो. हा क्षण केवळ एक रीत म्हणून नव्हे तर सामाजिक सन्मानाचा भाग म्हणून साजरा केला जातो, असं भारत राठोड सांगतात.
जग वेगाने बदलत असतानाही बंजारा समाजाने आपली परंपरा टिकवून ठेवली आहे. आधुनिकतेच्या लाटेत अनेक जुनी रीतिरिवाज हरवत असताना घोटा पद्धत मात्र समाजाच्या मुळांशी घट्ट जोडलेली आहे. नव्या पिढीला आपल्या परंपरेचा अभिमान वाटावा या उद्देशाने या पद्धतीला महत्त्व दिले जातं.
या परंपरेमुळे बंजारा समाजातील एकोपा, सहकार्य आणि एकात्मता अधिक दृढ होते. त्यामुळे घोटा ही केवळ लग्नाची एक पद्धत न राहता ती समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. समाजातील जेष्ठ मंडळी आणि युवक यांच्यातील दुवा म्हणूनही ही परंपरा आजतागायत जिवंत आहे, असंही भारत राठोड यांनी सांगितलं.





