दुबई: आशिया कप 2025च्या ग्रुप एमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील ‘नो-हँडशेक’ प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार या वादग्रस्त प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांना टॉसच्या काही मिनिटे आधीच दोन्ही कर्णधार—सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आघा—यांच्यात हँडशेक होणार नाही, अशी माहिती देण्यात आली. पायकॉफ्ट यांना “टॉसच्या चार मिनिटे आधी” या निर्णयाची कल्पना देण्यात आल्याचे कळते.
advertisement
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यापूर्वी टॉस होण्याच्या अगोदर आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या व्हेन्यू मॅनेजरने पायकॉफ्ट यांना सांगितले की- बीसीसीआयने हस्तांदोलन होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच बीसीसीआयने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाला जेव्हा ही माहिती देण्यात आली, तेव्हा पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत पायकॉफ्ट यांनी हा निर्णय आयसीसीला वेळेआधी कळवायला हवा होता, असे सांगितले. मात्र पायकॉफ्ट यांनी स्वतःकडे जास्त वेळ नसल्याचे स्पष्ट केले. टॉसच्या आधी झिम्बाब्वेचे हे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानचा कर्णधार आघा यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन न होण्याच्या निर्णयाबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून टॉसवेळी कोणतीही लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ नये.
या संपूर्ण वादानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने पायकॉफ्ट यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आणि क्रिकेटच्या भावनेला धक्का पोहोचवल्याचा आरोप करत त्यांना उर्वरित आठ संघांच्या स्पर्धेतून वगळण्याची मागणी केली. मात्र आयसीसीने ही मागणी नाकारली.
यानंतर पाकिस्तान विरुद्ध यूएई सामन्याच्या काही मिनिटे आधी पीसीबीने एक निवेदन जारी करत सांगितले की, पायकॉफ्ट यांनी पाकिस्तानचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांची गैरसमजुतीबद्दल माफी मागितली आहे.
पीसीबीचा व्हिडिओ वाद
बुधवारी पीसीबीने आपल्या सोशल मीडियावर पायकॉफ्ट आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ व्यवस्थापन (कर्णधार, प्रशिक्षक आणि टीम मॅनेजर) यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. मात्र हा व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित करणे हे आयसीसीच्या PMOA (Players and Match Officials Area) मार्गदर्शक तत्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी याबाबत आधीच पीसीबीला पत्र लिहून आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल कळवले आहे. या प्रकरणात दंड किंवा अन्य कारवाई होते का, हे पाहणे बाकी आहे.
हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटच्या मार्गदर्शक तत्वांनुसार PMOA परिसरात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप सुपर-4 टप्प्यातील पुढचा सामना 21 सप्टेंबर रविवार रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या मॅचमध्ये देखील ‘नो-हँडशेक’ धोरण कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे आणि सामन्यानंतरही पारंपरिक हस्तांदोलनाची औपचारिकता होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.