पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता टीम इंडिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यासोबतही हस्तांदोलन करणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. आशिया कपच्या फायनलमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख म्हणून मोहसिन नक्वी विजयी टीमला ट्रॉफी देणार आहेत, त्यामुळे टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर मोहसिन नक्वी यांच्यासोबत व्यासपीठावर जाणार नाहीत, असं वृत्त समोर आलं आहे. आशिया कपची फायनल 28 सप्टेंबरला होणार आहे.
advertisement
'टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली तर भारतीय खेळाडू नक्वी यांच्यासोबत व्यासपीठावर नसतील,' असं वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
पाकिस्तानची माघार घेण्याची धमकी
दरम्यान आशिया कपच्या ग्रुप ए सामन्यात टॉस दरम्यान दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करू नका, असे सांगणाऱ्या मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांच्या कृतीबद्दलही पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पायक्रॉफ्टना आशिया कपमधून रेफरी म्हणून काढून टाकावं, अशी मागणी पीसीबीने आयसीसीकडे केली आहे. पायक्रॉफ्ट यांनी आयसीसीची आचारसंहिता आणि एमसीसी कायद्यांचं उल्लंघन केलं, तसंच एका टीमची बाजू घेतली, असं पीसीबीने त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
आयसीसीने फेटाळली मागणी
दुसरीकडे आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळून लावली आहे. हस्तांदोलन वादामध्ये पायक्रॉफ्ट यांची भूमिका मर्यादित होती. सार्वजनिक ठिकाणी मानहानी होऊ नये, म्हणून पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन न करण्यास सांगितल्याचं आयसीसीचं मत आहे. आता आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी फेटाळून लावल्यामुळे पाकिस्तान युएईविरुद्ध खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. पाकिस्तान युएईविरुद्ध खेळली नाही तर युएईला 2 पॉईंट्स मिळतील आणि ते सुपर-4 मध्ये प्रवेश करतील, यामुळे पाकिस्तानचं आशिया कपमधील आव्हान मात्र संपुष्टात येईल.