बीसीसीआयचा पाकिस्तानला इशारा
बीसीसीआयने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल पाठवला आहे.या ईमेलमधून विजेत्या संघाला शक्य तितक्या लवकर ट्रॉफी सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. "आम्ही एसीसीला पत्र लिहून विनंती केली आहे की ही ट्रॉफी विजेत्या संघाला सादर करावी. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.जर प्रतिसाद मिळाला नाही किंवा नकारात्मक प्रतिसाद आला तर आम्ही आयसीसीला पत्र लिहू,आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत आणि असे करत राहू, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.
advertisement
देवजीत सैकिया यांनी पुढे स्पष्टच शब्दात पाकिस्तानला इशारा दिला. जर मोहसिन नकवी आशिया कप ट्रॉफी परत करण्यास तयार झाले नाहीत तर बीसीसीआय कठोर कारवाई करेल.तसेच जर आशिया कप ट्रॉफी भारतात परत केली नाही तर बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र लिहेल. मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष देखील आहेत.
नेमक राडा काय?
27 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. फायनल खेळण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तसेच भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) उपाध्यक्ष यांना ट्रॉफी देण्याची विनंती केली होती. पण मोहसिन नकवी यांनी ही अट मान्य करण्यास नकार दिला होता.
दरम्यान सामना जिंकूनही भारतीय खेळाडूंनी जवळजवळ एक तास मैदानावर वाट पाहिली, परंतु जेव्हा परिस्थिती बदलली नाही तेव्हा ते आशिया कप ट्रॉफीशिवाय ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले होते. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नाही, ज्यामुळे बराच वाद पेटला होता.