भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने अशी कामगिरी केली आहे जी आजवर कोणत्याही भारतीय जलद गोलंदाजाला करता आली नाही. तिसऱ्या कसोटीत बुमराहने ९४ धावा देत ९ विकेट घेतल्या होत्या, ज्यामुळे त्याला १४ रेटिंग गुण मिळाले. आयसीसी क्रमवारीत ९०४ गुण मिळवणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. याआधी आर अश्विनने २०१६ साली अशी कामगिरी केली होती. बुमराहचा सध्याचा फॉर्म पाहता तो अश्विनला मागे टाकून पुढे जाऊ शकतो. कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत १९१४ साली इंग्लंडच्या सिडनी बॉर्न्स यांनी सर्वाधिक ९३२ रेटिंग गुण मिळवले होते. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ कसोटीत २१ विकेट घेतल्या आहेत.
advertisement
सध्याच्या क्रमवारीत बुमराह अव्वल स्थानी असून अन्य खेळाडू त्याच्या आसपास देखील नाहीत. क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर असून त्याचे ८५६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड ८५२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४२ धावात ४ विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉप १० मध्ये जागा मिळवली आहे.
फलंदाजांचा विचार केल्यास भारताविरुद्धच्या मालिकेत धमाकेदार खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे ८२५ गुण झाले आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रुट अव्वल स्थानी आहे. रुटचे ८९५ गुण आहेत. ऑलराऊंडरच्या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा ४२४ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.
