शाहिन आफ्रिदीने ब्रिस्बेन हिट्सकडून खेळताना मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यातून बीबीएलमध्ये पदार्पण केलं, पण पदार्पणाचा हा सामना आफ्रिदीसाठी लाजिरवाणा ठरला. या सामन्यात आफ्रिदीच्या टीमचा 14 रननी पराभव झाला. 25 वर्षांच्या शाहिन आफ्रिदीला त्याच्या 4 ओव्हरही पूर्ण करता आल्या नाहीत, तर बॅटिंगमध्येही आफ्रिदी डकवर माघारी परतला.
शाहिन आफ्रिदीने 2.3 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 43 रन दिले. दोन बिमर टाकल्यामुळे अंपायरने आफ्रिदीला बॉलिंगवरून हटवलं, त्यानंतर नॅथन मॅकस्विनीने 18 वी ओव्हर पूर्ण केली. रेनेगेड्सकडून टीम सायफर्टने शतक झळकावलं, तर ओलिव्हर पिकने अर्धशतक केलं, त्यामुळे त्यांनी 20 ओव्हरमध्ये 212/5 पर्यंत मजल मारली.
advertisement
शाहिन आफ्रिदीने आतापर्यंत 239 टी-20 मॅच खेळल्या आहेत, यात त्याने 7.87 च्या इकोनॉमी रेटने 334 विकेट घेतल्या. हिटकडून जॅक विल्डरमुथने 34 रन देऊन 3 विकेट घेतल्या. तर झेवियर बार्टलेट आणि पॅट्रिक डुली यांना एक-एक विकेट मिळाली. आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या रेनेगेड्सची सुरूवात खराब झाली, ओपनर विल्डरमुथ शून्य रनवर आऊट झाला. तर चौथ्या ओव्हरमध्ये मॅकस्विनी पॅव्हेलियनमध्ये परतला.
सुरूवातीच्या विकेट लवकर गमावल्यानंतर हिटने 11.1 ओव्हरमध्ये 100/3 एवढा स्कोअर केला, पण 13 ओव्हरमध्ये त्यांची अवस्था 108/6 अशी झाली. जिमि पिअरसनने 50 आणि हुघ वेबिगनने 38 रनची खेळी केली, पण 20 ओव्हरमध्ये त्यांना 198/8 पर्यंतच मजल मारता आली.
दुसरीकडे पाकिस्तानचा विकेट कीपर मोहम्मद रिझवान याचंही बीबीएल पदार्पण निराशाजनक झालं. रेनेगेड्सकडून खेळताना रिझवान 10 बॉलमध्ये 4 रन केल्या. विकेट कीपिंगमध्ये रिझवानने एक कॅच पकडला. त्याआधी रविवारी बाबर आझमने सिडनी सिक्सर्सकडून पदार्पण केलं, पण तोदेखील 2 रनवर आऊट झाला.
