भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हर्षित राणाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तसंच संजू सॅमसनला टीममधून वगळण्याबाबतही श्रीकांत यांनी टीका केली. श्रीकांत यांनी त्यांच्या युट्युब चॅनवरून टीम इंडियाच्या सिलेक्शनवर निशाणा साधला.
हर्षित राणा नौटंकी
हर्षित राणा हा भारताच्या आशिया कप विजेत्या टीममचा भाग होता, यानंतर आता त्याची ऑस्ट्रेलियामधील वनडे सीरिजसाठीही टीममध्ये निवड झाली. या सीरिजसाठी 4 स्पेशलिस्ट फास्ट बॉलरमध्ये हर्षित राणा आहे. 'अशा निवडी करून ते खेळाडूंनाच गोंधळात टाकत आहेत. अचानक यशस्वी जयस्वाल येतो, तो पुढच्या क्षणी तिथे राहत नाही. टीममध्ये फक्त एकच कायमस्वरूपी सदस्य आहे, तो म्हणजे हर्षित राणा. तो टीममध्ये का आहे कुणालाही माहिती नाही. सतत बदल करून ते खेळाडूंचा आत्मविश्वास कमी करतील', असं श्रीकांत म्हणाले आहेत.
advertisement
'काही खेळाडू चांगलं करत असले, तरीही तुम्ही त्यांची निवड करत नाही. काही खेळाडू चांगले करत नसले, तरीही त्यांची निवड होते. गंभीरचा येस मॅन म्हणजे हर्षित राणा', असा आरोपही श्रीकांत यांनी केला आहे. 'हर्षित राणा फिल्मी नौटंकी करतो. या फिल्मी रिएक्शन्सचा काही उपयोग नाही, तुम्हाला मैदानात चांगली बॉलिंग करावी लागेल. तो आयपीएलमध्येही अशा फिल्मी रिएक्शन्स देतो. ही चांगली वृत्ती नाही, फक्त शो बाजी आहे. बॉल अडवल्यानंतर तो डाईव्ह मारतो. इतकी शो बाजी करायची गरज का?', असा सवालही श्रीकांत यांनी विचारला आहे.
'तुम्ही 2027 च्या वर्ल्ड कपची तयारी सुरू करावी, पण मला वाटते की त्यांनी तसं केलेलं नाही. तुमच्या शक्यतांमध्ये हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी असतील, तर तुम्ही ट्रॉफी जिंकणं विसरा', असा टोलाही श्रीकांत यांनी लगावला. राणाच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान झाली, जिथे त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियामधील दोन टेस्ट सामन्यांमध्ये राणाने 4 विकेट घेतल्या, यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. युएईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्येही हर्षित राणा होता.
आशिया कपमध्येही हर्षितला 2 मॅचमध्ये संधी मिळाली, पण त्याची कामगिरी निराशाजनक झाली. 2 सामन्यांमध्ये त्याने 79 रन देऊन 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 सामन्यामध्ये हर्षितने 54 रन दिल्या आणि एक विकेट घेतली, या कामगिरीवरून हर्षितवर मोठ्याप्रमाणावर टीका झाली.