दुबई: रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव करून आशिया कपचे विजेतेपद मिळवले. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला. कुलदीप यादवची भन्नाट फिरकी आणि त्यानंतर तिलक वर्माने केलेली वादळी खेळी यामुळे भारताने ऐतिहासिक असा विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेला राडा विजयानंतर देखील कायम राहिल्याचे दिसले.
advertisement
भारताने पाकिस्तानी नेते आणि ACCचे अध्यक्ष नक्वी यांच्याकडून चषक स्विकारण्यास नकार दिला. यामुळे पुरस्कार सोहळ्यात फक्त पाकिस्तानच्या खेळाडूंनी बक्षिस देण्यात आले. तर भारताच्या तिलक वर्माला सामनावीर आणि अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्कार दिला गेला.
टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून संघाचे अभिनंदन केले. त्यांनी “खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर” असा उल्लेख केला होता. ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली. विजेतेपद मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत विचार असता तो म्हणाला- देशाचा नेता स्वतः फ्रंटफुटवर येऊन बॅटिंग करतो, असे वाटले. जणू सरांनी स्वतः स्ट्राईक घेतली आणि चौकार-षटकार मारले. ते पाहून खूप छान वाटले. आणि जेव्हा सर स्वतः आपल्या समोर उभे असतात, तेव्हा खेळाडूंनाही नक्कीच मुक्तपणे खेळायला प्रेरणा मिळते.
सूर्यापुढे म्हणाला- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देश सध्या जल्लोष साजरा करत आहे. आम्ही जेव्हा परत भारतात जाऊ, तेव्हा खूप छान वाटेल. आणखी जास्त प्रेरणा आणि मोटिवेशन मिळेल की देशासाठी अजून चांगलं खेळायचं.