भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 21 सुवर्ण, 33 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह तिरंदाजीमध्ये 3, कबड्डीमध्ये 2 पदके जिंकली आहेत तर बॅडमिंटन, ब्रिज, क्रिकेट आणि हॉकीमध्ये प्रत्येकी एक पदकही निश्चित आहे. याआधी 2018 मध्ये भारताने गेम्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करत 70 पदके जिंकली होती. भारतीय खेळाडूंनी आत्तापर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत 91 पदके जिंकली आहेत आणि त्यांची उर्वरित 9 पदके निश्चित झाली आहेत. साहजिकच भारताच्या पदकतालिकेत किमान 100 पदके असणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 1951 पासून खेळल्या जाणाऱ्या या खेळांमध्ये भारत पहिल्यांदाच पदकांचे शतक ठोकणार आहे. दरम्यान, चिनी पंचांकडून पक्षपात केल्याच्या बातम्या देखील आहेत, असे असूनही भारतीय खेळाडू पूर्ण क्रीडा भावनेने आपली सर्वोच्च कामगिरी करत आहेत.
advertisement
वाचा - 9 वर्षांचा दुष्काळ संपला, भारतीय हॉकी संघाचं थेट सुवर्णयश, ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा
मागच्या वेळची कामगिरी कशी?
भारताने गेल्या वेळी जकार्ता येथे 70 पदके जिंकली होती, ज्यात 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश होता. यावेळी नेमबाजांनी 22 तर अॅथलेटिक्समध्ये 29 पदके जिंकली आहेत, त्यामुळे भारताला सर्वोत्तम कामगिरी करता आली. भारतीय संघाने अनेक अनपेक्षित पदके जिंकली, ज्यात महिला टेबल टेनिस सांघिक कांस्य (सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी) यांचा समावेश आहे. पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत शेवटच्या 30 मीटरमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले. भालाफेकमध्ये ऑलिम्पिक आणि विश्वविजेता नीरज चोप्राने सुवर्णपदक तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले. अर्जुन सिंग आणि सुनील सिंग यांनी कॅनोइंगमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले तर रामबाबू आणि मंजू राणी यांनी 35 किमी चालण्यात कांस्यपदक मिळवले.