टीम इंडियाचा महिला संघ हा 5 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने दक्षिण आफ्रिकेला 52
धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला. इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर भारताचे हे पहिलेच विश्वविजेतेपद होते, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर ट्रॉफी जिंकणारा भारताचा हा केवळ चौथा संघ ठरला आहे.
advertisement
दरम्यान भारताच्या या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. स्पोर्टस्टारमधील वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सोमवारी पंतप्रधान कार्यालयाकडून औपचारिक निमंत्रण मिळाले आणि सध्या मुंबईत असलेल्या खेळाडू मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला जातील आणि नंतर आपापल्या घरी जातील.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सहरसा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले होते. तसेच देशाचे पहिले विश्वचषक विजेतेपद घरी आणून इतिहास रचला आहे, हा विजय त्यांच्या वाढत्या आत्मविश्वास आणि ताकदीचे प्रतिबिंब आहे,अशा शब्दात त्यांनी कौतुक केले होते.
"काल मुंबईत, भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. २५ वर्षांनंतर, जगाला एक नवीन विश्वविजेता मिळाला आहे आणि भारताच्या मुलींनी संपूर्ण देशाला हा अभिमान दिला आहे. हा विजय केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही. हा भारताच्या मुलींच्या नवीन आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
विजेत्या संघाला 51 कोटीची बक्षीस
दरम्यान बीसीसीआयने अद्याप कोणताही उत्सव आयोजित केलेला नसला तरी, बोर्ड सचिव देवजित सैकिया यांनी विश्वचषक विजेत्या संघासाठी 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले."भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकल्याबद्दल कौतुकाचा प्रतीक म्हणून, बीसीसीआय 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देईल. त्यात सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि राष्ट्रीय निवड समितीचा समावेश आहे," असे सैकिया यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले.
