रणजी ट्रॉफीमध्ये अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडू त्यांच्या राज्य संघांकडून खेळत असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. श्रेयस अय्यर, अजिंक्य राहणे, आणि बरेच खेळाडू खेळात आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणजी खेळणाऱ्या खेळाडूंना किती सामन्यांमध्ये किती पैसे मिळतात याचा खुलासा खेळाडूंनी केला आहे. हिम्मत सिंग आणि प्रिन्स यादव यांनी किती मॅच मागे किती पैसे खेळाडूला दिले जातात याचा खुलासा केला आहे.
advertisement
रणजी ट्रॉफी खेळाडूंना किती मिळतात पैसे?
रणजी ट्रॉफीमधील खेळाडूंना त्यांच्या अनुभवाच्या आधारावर पैसे दिले जातात. बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंच्या वेतन रचनेत सुधारणा केली आहे.
या स्पर्धेत खेळणाऱ्या ज्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये 40 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यांना जर ते प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील तर त्यांना दररोज 60,000 रुपये मिळतात, तर जर ते राखीव खेळाडू असतील तर त्यांना दररोज 30,000 रुपये मिळतात.
रणजी ट्रॉफीमध्ये 21 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्यास प्रतिदिन 50,000 रुपये आणि राखीव खेळाडू असल्यास प्रतिदिन 25,000 रुपये मिळतात.
जर एखाद्या खेळाडूने नुकतेच रणजी ट्रॉफी खेळायला सुरुवात केली असेल आणि त्याने 20 सामने खेळले असतील, तर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर त्याला दररोज 40,000 रुपये मिळतात. जर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल आणि राखीव खेळाडू म्हणून खेळत असेल तर त्याला दररोज 20,000 रुपये मिळतात.
रणजी ट्रॉफीमध्ये, जर एखादा खेळाडू अद्याप खेळला नसेल परंतु तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, तर त्याला दररोज 25,000 रुपये मिळतात. तथापि, जर हा खेळाडू फक्त राखीव खेळाडू असेल तर त्याला कोणतेही पैसे मिळत नाहीत.