मॅचच्या चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर मिड विकेटला नितीश रेड्डीने ट्रॅविस हेडचा कॅच सोडला. नितीश रेड्डीने कॅच सोडला तेव्हा हेड 7 रनवर बॅटिंग करत होता, पण या जीवदानाचा हेडला फार फायदा करता आला नाही. 40 बॉलमध्ये 28 रन करून हेड आऊट झाला. हर्षित राणाच्या बॉलिंगवर विराट कोहलीने हेडचा कॅच पकडला.
advertisement
हेडचा कॅच सोडल्यानंतर टीम इंडियाने मॅथ्यू शॉर्टला दोन जीवनदान दिली. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी मॅथ्यू शॉर्टचा कॅच सोडला. हे दोन कॅच सोडल्यानंतर मॅथ्यू शॉर्टने अर्धशतक झळकावलं. 16 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला नितीश रेड्डीच्या बॉलिंगवर मॅथ्यू शॉर्टने पॉईंटच्या दिशेने फटका मारला, पण अक्षर पटेलने हा कॅच सोडला, यावेळी मॅथ्यू शॉर्ट 23 रनवर खेळत होता.
यानंतर 29 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर मोहम्मद सिराजने मॅथ्यू शॉर्टला लाईफलाईन दिली. मॅथ्यू शॉर्टने कव्हरच्या दिशेने बॉल मारला, तेव्हा बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने कॅच सोडला, तेव्हा शॉर्ट 55 रनवर खेळत होता. यानंतर अखेर मोहम्मद सिराजनेच मॅथ्यू शॉर्टचा कॅच हर्षित राणाच्या बॉलिंगवर पकडला. 74 रनची खेळी करून मॅथ्यू शॉर्ट आऊट झाला.
विराट पुन्हा फेल, रोहितचं अर्धशतक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करताना कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. विराट कोहली लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शून्य रनवर आऊट झाला. वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा शून्यवर आऊट होण्याची विराटची ही पहिलीच वेळ आहे. तर शुभमन गिल 9 रनवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताची बॅटिंग सावरली. रोहित शर्माने 73, श्रेयस अय्यरने 61 आणि अक्षर पटेलने 44 रनची खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाला 264 रनपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर झेवियर बार्टलेटला 3 आणि मिचेल स्टार्कला 2 विकेट घेण्यात यश आलं.
