विराटचे दोन्ही सामन्यात डक
पर्थनंतर आता सिडनीमधल्या सामन्यातही विराट कोहली शून्यवर आऊट झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन सामन्यात शून्यवर आऊट होण्याची विराटची ही पहिलीच वेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 7 महिन्यांनी विराट कोहलीने भारतीय टीममध्ये कमबॅक केलं, पण दोन्ही सामन्यात विराटला त्याच्या नावाला साजेसा खेळ करता आला नाही. दोन्ही सामन्यात शून्य रनवर आऊट झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा स्कोअर करता आला नाही, ज्यामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.
advertisement
गिल पुन्हा अपयशी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजआधी निवड समिती आणि बीसीसीआयने रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून शुभमन गिलला कर्णधार केलं, पण पहिल्या दोन्ही सामन्यात गिल त्याच्या कॅप्टन्सी आणि बॅटिंगमध्येही अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात 10 रनवर आऊट होणारा गिल दुसऱ्या सामन्यात 9 रनवर आऊट झाला.
राहुलला सहाव्या क्रमांकावर बॅटिंग
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय टीम मॅनेजमेंटने केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. खरतर केएल राहुलचा या टीममधली भूमिका इनिंगला आकार देण्याची आहे, पण त्याऐवजी त्याला फिनिशरच्या रोलमध्ये सहाव्या क्रमांकावर संधी दिली गेली. केएल राहुलऐवजी अक्षर पटेल याला दोन्ही सामन्यात पाचव्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली.
बॉलरपेक्षा ऑलराऊंडरवर विश्वास
पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही कर्णधार शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर यांनी भारताची प्लेइंग इलेव्हन बदलली नाही. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही ऑलराऊंडरवर गिल आणि गंभीरने विश्वास दाखवला, तसंच हर्षित राणालाही पुन्हा एकदा खेळवलं गेलं. दोन्ही ऑलराऊंडर खेळवले गेले तरीही भारताला एकाही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तसंच या ऑलराऊंडरनी बॉलिंगमध्येही चमक दाखवली नाही.
कुलदीप-कृष्णा बेंचवर
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम मॅनेजमेंटने कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाला बेंचवर बसवलं. कुलदीप यादव हा आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता, पण चांगल्या फॉर्ममध्ये असूनही कुलदीपवर विश्वास दाखवला गेला नाही. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा हा गुड लेन्थ आणि शॉर्ट ऑफ गुड लेन्थ बॉलिंगसाठी ओळखला जातो, ज्याचा फायदा त्याला ऑस्ट्रेलियामधल्या बाऊन्स असणाऱ्या खेळपट्ट्यांवर झाला असता, पण तरीही प्रसिद्ध कृष्णाला बेंचवरच बसवण्यात आलं.
आता शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडिया या चुका सुधारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण टीम इंडियाने सीरिज गमावली असली तरी व्हाईट वॉश टाळण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
