अर्शदीप सिंग हा भारताचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तरीही, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नव्हते. पण आज त्याला संधी मिळाली आणि त्याने सोनं करून दाखवलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर अर्शदिप सिंह म्हणाला, "मी फक्त माझ्या प्रक्रियेवर काम करत आहे, माझ्या कौशल्यांवर विश्वास ठेवत आहे आणि माझ्या योजना राबवत आहे. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा योगदान देणे खूप छान वाटते. आक्रमक फलंदाजांना गोलंदाजी करणे मजेदार असते. जेव्हा कोणी तुमच्यावर हल्ला करत असते तेव्हा नेहमीच विकेट घेण्याची संधी असते.
advertisement
जेव्हा जसप्रीत बुमराह दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करतो तेव्हा त्याच्या(अर्शदिप) विकेट घेण्याची शक्यता वाढते. "जेव्हा बुमराहसारखा गोलंदाज दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाज माझ्याविरुद्ध जास्त जोखीम घेतात, ज्यामुळे मला विकेट घेण्याची संधी मिळते. मी फक्त माझ्या गोलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती, पॉवरप्ले किंवा डेथ ओव्हर्स काहीही असो, मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो, असे अर्शदिप सिंह म्हणाला.
कसा रंगला सामना
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय वरुण चक्रवर्तीला 2 आणि शिवम दुबेला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरूवात झाली नव्हती. पण शेवट्च्या क्षणी वॉशिंग्टन सुंदरने 49 धावांची मॅच विनिंग खेळी केली. यावेळी त्याला जितेश शर्माने 22 धावा करून चांगली साथ दिली होती. अशाप्रकारे भारताने 5 विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
