विराट कोहली, रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर मागच्या दोन महिन्यांपासून बातम्यांमध्ये आहेत. रोहित आणि विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यासाठी अनेकांनी गंभीरला जबाबदार धरलं. या सगळ्या वादानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर पहिल्यांदाच एकत्र आले. पर्थमध्ये रोहित शर्मा टीम इंडियासोबत सराव करत होता, तेव्हा रोहित आणि गंभीर यांच्यात संवाद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
स्टार स्पोर्ट्सच्या क्लिपमधील हा व्हिडिओ आहे, ज्यात रोहित नेटमध्ये जाण्याआधी गौतम गंभीरसोबत संवाद साधत आहे. यानंतर रोहित सराव करण्यासाठी गेला. नेट प्रॅक्टिसमध्ये रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. ऑस्ट्रेलियाच्या जलद आणि बाऊन्सी खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलिंगचा सामना करण्याचं आव्हान रोहित शर्मासमोर आहे.
गंभीर-गिलकडून रोहितचं कौतुक
गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. या दोघांच्या अनुभवाची टीम इंडियाला गरज असल्याचं गिल आणि गंभीरने सार्वजनिक व्यासपीठावर सांगितलं आहे.
'50 ओव्हरचा वर्ल्ड कप अजून दोन वर्ष दूर आहे. या काळात टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे. दोन्ही खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत, ते दर्जेदार खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा अनुभव टीमसाठी मौल्यवान असेल', असं गंभीर म्हणाला आहे. तर दुसरीकडे गिलने रोहित आणि विराट 2027 वर्ल्ड कपच्या योजनांचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे.
'मागच्या 10-15 वर्षांपासून विराट आणि रोहित भारताकडून खेळत आहेत आणि आम्हाला मॅच जिंकवून देत आहेत. त्यांना असलेला अनुभव प्रत्येक कर्णधाराला आणि टीमला हवा असतो', असं गिल म्हणाला आहे.