दिग्गज बॅटरनी भरलेली टीम इंडियाची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. रोहित शर्मा 11 रनवर, शुभमन गिल 23 रनवर, श्रेयस अय्यर 3, केएल राहुल 1 आणि रवींद्र जडेजा 12 रनवर आऊट झाले, पण विराट कोहलीने आधी नितीश कुमार रेड्डी आणि मग हर्षित राणासोबत किल्ला लढवला.
विराट कोहलीने 108 बॉलमध्ये 124 रन केले, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर नितीश कुमार रेड्डीने 57 बॉलमध्ये 53 रन केले. रेड्डीने त्याच्या या खेळीमध्ये 2 फोर आणि 2 सिक्स लगावल्या. विराटचं शतक आणि रेड्डीने अर्धशतक केलं असलं तरी हर्षित राणाने मात्र आठव्या क्रमांकावर बॅटिंग करून धमाका केला आहे.
advertisement
हर्षित राणाने 43 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 52 रन केल्या. मागच्या बऱ्याच काळापासून हर्षित राणाला टीममध्ये घेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. गौतम गंभीरचा फेवरेट खेळाडू असल्यामुळे हर्षितला टीम इंडियामध्ये संधी मिळत असल्याचे आरोपही केले गेले, पण हर्षितने या सगळ्या आरोपांना त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगने प्रत्युत्तर दिलं. बॅटिंगमध्ये अर्धशतक झळकावण्याच्या आधी हर्षितने बॉलिंगमध्येही 3 विकेट घेतल्या होत्या.
टीम इंडियाचा सगळ्यात मोठा मॅच विनर असलेला ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला वारंवार दुखापतींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे तो सध्या फक्त टी-20 क्रिकेटच खेळत आहे. वनडे क्रिकेटमध्ये भारताला आठव्या क्रमांकावर बॅटिंगही करू शकेल, असा हार्दिक पांड्यासारखा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर हवा आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट हर्षित राणाकडे हार्दिकचा पर्याय म्हणून पाहत आहे, हर्षितने त्याच्या या ऑलराऊंड खेळीमुळे टीम इंडियाचा विश्वास नक्कीच वाढवला आहे.
