भारत-पाकिस्तान सामन्यातील राड्यानंतर बीसीसीआय आणि पीसीबीने एकमेकांच्या खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आयसीसीने तपास केला असता हारिस राऊफ दोन प्रकरणांमध्ये दोषी आढळला, त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादव आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे, जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या मानधनाच्या 30 टक्के रक्कम दंड आकारला जाईल, तसंच त्याला दोन डिमेरिट पॉईंट्स दिले जातील. याशिवाय अर्धशतक केल्यानंतर एके-47 चं सेलिब्रेशन केलेला साहिबजादा फरहान हादेखील दोषी आढळला आहे, पण त्याला इशारा देऊन सोडून देण्यात आलं आहे. तसंच त्यालाही एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. हारिस राऊफही याच गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे त्याला मानधनाच्या रकमेतील 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि 2 डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले आहेत.
advertisement
सूर्या ऑस्ट्रेलियात खेळणार का नाही?
सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सीरिज खेळत आहे. दोन्ही टीममध्ये चौथा सामना गुरूवारी होणार आहे. आयसीसीने सूर्यकुमार यादववर बंदी घातलेली नाही, तर त्याच्या मानधनातली रक्कम कापण्यात आली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव खेळू शकणार आहे. दुसरीकडे हारिस राऊफ मात्र पाकिस्तानकडून पुढचे 2 सामने खेळू शकणार नाही.
भारत-पाकिस्तान सामन्यात वाद
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामने झाले, पण या तीनही सामन्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, यानंतर पीसीबीने आयसीसीकडे याबद्दल तक्रार दाखल केली. दुसऱ्या सामन्यात हारिस राऊफने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांकडे पाहून तसंच विकेट घेतल्यानंतर विमान पडल्याचं सेलिब्रेशन केलं. तर साहिबजादा फरहान याने अर्धशतकानंतर बॅटने एके-47 चालवल्याचं सेलिब्रेशन केलं, यानंतर बीसीसीआयनेही आयसीसीकडे तक्रार दाखल केली.
