दुबई : भारत आणि पाकिस्तान रविवारी दुबईत आशिया कपच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. 1984 मध्ये आशिया कपची सुरुवात झाली होती. स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया स्पर्धेत अपराजित आहे. याच कारणामुळे भारताला फेव्हरेट मानले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानला या स्पर्धेत आतापर्यंत 6 पैकी दोन वेळा पराभव पत्करावा लागला आहे आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्याला भारतानेच पराभूत केले आहे.
advertisement
अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार आहे. तिथे साधारणतः पावसाची शक्यता अत्यल्प असते. तरीसुद्धा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनं सोमवार, 29 सप्टेंबर हा दिवस राखीव ठेवला आहे. नियमांनुसार जर सामना हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे राखीव दिवशीसुद्धा पूर्ण होऊ शकला नाही तर आशिया कपची ट्रॉफी दोन्ही संघांना देण्यात येईल. आशिया कपच्या इतिहासात आजवर असं कधी झालेलं नाही.
दुबईतील उष्ण हवामान
दुबईत पावसाची शक्यता नसली तरी डेजर्ट स्टॉर्म (वाळवंटातील वादळ) येण्याची शक्यता असते. हवामानाचा अंदाज पाहता रविवारी दुबईत कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. मात्र तिथे लोकांना 42 डिग्री सेल्सिअससारखी उष्णता जाणवेल. अशा कठीण हवामानात दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी खेळणं मोठं आव्हान असेल. एवढ्या उष्णतेमध्ये खेळल्यामुळे स्नायूंना गोळे येण्याची (क्रॅम्प्स) शक्यता खूप वाढते.
आशिया कपचा इतिहास
आशिया कपचं आयोजन 17व्यांदा होत आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ही स्पर्धा 8 वेळा जिंकली आहे. तर पाकिस्तानचा संघ फक्त दोन वेळा विजेता ठरला आहे. या 17 पैकी दोन वेळा आशिया कप टी20 फॉरमॅटमध्येही झाला आहे. 2016 मध्ये पहिल्यांदा झालेल्या टी20 फॉरमॅटच्या आशिया कपमध्ये भारत विजयी झाला होता. 2022 मध्ये पाकिस्तानने टी20 फॉरमॅटच्या आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र दुबईच्या मैदानावरच त्याला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.