विकेटकीपर आणि फिल्डर भिडले
आयसीसी महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सामना भारताविरुद्ध होता. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने मोठी चूक केली. रिचा घोषच्या बॅटच्या एजला लागून बॉल हवेत गेला. यानंतर विकेट कीपर आणि बॅकवर्ड पॉईंटची फिल्डर कॅच पकडण्यासाठी आली. विकेटकीपर सिद्रा नवाजने कॅच घेण्यासाठी धाव घेतली, पण तेव्हाच पॉइंटवरून नतालिया परवेझही आली, त्यामुळे दोघींमध्ये टक्कर झाली आणि बॉल सिद्राच्या हातातून बाहेर गेला.
advertisement
हा कॅच सोडल्यानंतर पाकिस्तानला फार नुकसान झालं नाही. रिचा एक रन करून नॉन-स्ट्रायकर एन्डला गेली. शेवटच्या ओव्हरमधील हा तिसरा बॉल होता, त्यानंतर ती स्ट्राईकवर परत येऊ शकली नाही. क्रांती गौडने चौथ्या बॉलवर फोर मारली, यानंतर टीम इंडियाने लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट गमावल्या आणि टीम इंडियाचा 247 रनवर ऑलआऊट झाला. रिचाने 20 बॉलमध्ये 35 रनची नाबाद खेळी केली.
भारताने दिलेलं 248 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा फक्त 159 रनवर ऑल आऊट झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा दोन सामन्यांमधला दुसरा विजय आहे. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर क्रांती गौडलाही 3 विकेट मिळाल्या, याशिवाय स्नेह राणाने 2 विकेट घेतल्या. या विजयासह टीम इंडिया महिला वर्ल्ड कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.