फायनलमध्ये विजयासाठी २९९ धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या द.आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. सलामीच्या जोडीने ५१ धावांची भागिदारी केली. अमनज्योत कौरने ताझमिन ब्रिट्सला रन आऊट केले. त्यानंतर आलेल्या ॲनेके बॉशला श्रीचरणीने शून्यावर बाद करून आफ्रिकेला मोठा धक्का दिला.
झटपट दोन विकेट मिळवल्यानंतर टीम इंडियाने गेममध्ये कमबॅक केला. मात्र त्यानंतर सुने लूस आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी संघाचे शतक पूर्ण केले. टीम इंडियाला विकेटची गरज असताना कर्णधार कौरने शेफाली वर्माच्या हाती चेंडू दिला आणि तिने २१व्या ओव्हरमध्ये सुने लूसला बाद केले. त्यानंतर शेफालीने २३व्या ओव्हरला आणखी एक विकेट घेत आफ्रिकेला माघारी ढकलले.
advertisement
एका बाजूने विकेट पडत असताना आफ्रिकेची कर्णधार मात्र दुसऱ्या बाजूने लढत होती. दीप्ती शर्माने ३०व्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या नेरी डर्कसेनने कर्णधार लॉरासह सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. आफ्रिकेचे द्विशतक पूर्ण झाल्यानंतर कर्णधार लॉराने शतक पूर्ण केले. वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलमध्ये शतकी खेळी करणारी ती एलिसा हिलीनंतरची दुसरी खेळाडू आहे.
त्याआधी प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने ५० षटकात ७ बाद २९८ अशी दमदार धावसंख्या उभी केली होती. टॉस जिंकल्यानंतर द.आफ्रिकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी १०४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. १८व्या षटकात स्मृती ४५ धावांवर बाद झाली. दरम्यान शेफालीने अर्धशतक पूर्ण केले. ५० धावांनंतर तिला एक जीवनदान मिळाले, ज्याचा तिने पुरेपुर फायदा घेतला आणि धावसंख्या वेगाने वाढवली.
फायनल मॅचमध्ये शेफाली शतकी खेळी करेल असे वाटत असताना २८व्या ओव्हरमध्ये ती ८७ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताच्या सेमी फायनलमधील विजयाची स्टार जेमीमा फक्त २४ धावांवर बाद झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर २० धावांवर माघारी परतील. यामुळे भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला. मात्र दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी अखेरच्या काही षटकात दमदार खेळी करून संघाला ३००च्या जवळ पोहोचवले. दीप्तीने ५८ धावा केल्या तर ऋचाने ३४ धावांचे योगदान दिले.
