भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टेस्ट 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर दुसरी टेस्ट 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. पहिली टेस्ट कोलकात्यामध्ये आणि दुसरी गुवाहाटीमध्ये होईल. यानंतर दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होईल, पण या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली गेलेली नाही.
टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम
advertisement
शुबमन गिल, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडीकल, ध्रुव जुरेल, रविंद्र जाडेजा, वॉश्गिंटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्सर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
हर्षित राणा टीमबाहेर
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा अतिशय लाडका खेळाडू म्हणून हर्षित राणा याला ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांपासून तो क्रिकेट स्पर्धेतली सर्व प्रारुपे खेळत आहे. हर्शित राणाच्या तिन्ही फॉरमॅट खेळण्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अगदी गौतम गंभीरने देखील २३ वर्षांच्या पोरावर टीका करू नका, असे म्हणत त्याची बाजू घेतली होती. परंतु बीसीसीआय निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघनिवड करताना हर्षित राणाला संघाबाहेर ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
ऋषभ पंतचे पुनरागमन
भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेसाठी पुनरागमन केले आहे. इंग्लंड दौऱ्यात रिषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. क्रिस वोक्स याला यॉर्कर चेंडू खेळताना रिषभच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेत त्याला आराम दिला गेला होता.
रणजी स्पर्धेत मोहम्मद शमीचा धमाका तरीही निवड नाही
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी स्पर्धेत अतिशय उत्तम कामगिरी केली. रणजी स्पर्धेच्या सुरुवातीच्या २ सामन्यांत तब्बल १५ बळी मिळवून आपण कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याने त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले होते. परंतु तरीही निवड समितीने शमीची दखल घेतली नाही. मी तंदुरुस्त असल्याचे निवड समितीला कळवणार नाही. त्यांनी मला संपर्क करावा, अशा शब्दात शमीने निवड समितीवर नाराजी दर्शवली होती. त्यामुळे आगरकर आणि शमीमध्ये काही वाद सुरू असल्याचेही बोलले गेले.
