नवी दिल्ली : भारताची सर्वात यशस्वी आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेली बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम सध्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे चर्चेत आली आहे. ‘मॅग्निफिसेंट मेरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी कोम आणि तिचे पती के. ओनलर कोम यांच्यातील वाद आता उघडपणे समोर आला असून, दोघांकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या वादामुळे केवळ मॅरीकॉमच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच नव्हे, तर संपूर्ण क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
advertisement
मेरी कोमच्या पती के. ओनलर कोम यांनी अलीकडेच वृत्तसंस्था IANS ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले. ओनलर यांच्या म्हणण्यानुसार, मेरी कोमचे 2013 साली एका कनिष्ठ (ज्युनियर) बॉक्सरसोबत प्रेमसंबंध होते. या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र त्या काळात कुटुंबीयांच्या मध्यस्थीने तडजोड झाली आणि प्रकरण तेथेच थांबले, असे ओनलर सांगतात.
पुढे त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, 2017 पासून मेरी कोमचे मेरी कोम बॉक्सिंग अकादमीत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध होते. या दाव्यांसाठी आपल्याकडे त्या व्यक्तीच्या नावासह व्हॉट्सअॅप चॅट्स आणि इतर खासगी संदेश असल्याचेही ओनलर यांनी म्हटले. “माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, पण इतकी वर्षे मी शांत राहिलो,” असे सांगत त्यांनी आता मौन तोडल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे मेरी कोमने स्वतः पती ओनलरवर गंभीर आरोप केले आहेत. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत मेरी कोमने सांगितले की, आपण आणि ओनलर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ वेगळे राहत आहोत आणि 2023 मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे.
“मी खेळात सक्रिय होते आणि माझ्या आर्थिक बाबींमध्ये माझा फारसा हस्तक्षेप नव्हता, तोपर्यंत सगळं ठीक होतं. मात्र 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी मला गंभीर दुखापत झाली. त्या काळात मी अनेक महिने अंथरुणाला खिळून होते, चालण्यासाठीही आधार घ्यावा लागत होता. तेव्हा मला जाणवलं की मी ज्या आयुष्यावर विश्वास ठेवला होता, ते खोटं होतं.”, असे मेरी कोमने सांगितले.
त्या काळात मला मानसिक धक्का बसला आणि आपण ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला होता, तो तसा नव्हता, हे सत्य समोर आले. “हे सगळं जगासमोर तमाशा व्हावा, अशी माझी इच्छा नव्हती. म्हणून अनेक वेळा तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस मला घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला. मी माझ्या आणि त्यांच्या कुटुंबियांनाही स्पष्ट सांगितले की, हे नातं आता पुढे चालू शकत नाही, आणि त्यांनीही ते मान्य केले,” असे मेरी कोमने सांगितले.
मेरी कोमने ओनलरवर आर्थिक फसवणुकीचेही आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्यासोबत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून, स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून खरेदी केलेली जमीनही गमावावी लागली. गेल्या एक वर्षापासून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मी शांत राहायचं ठरवलं होतं, पण माझ्या गप्प राहण्याचा गैरसमज केला गेला आणि आरोप वाढतच गेले,” असे मेरी कोमने स्पष्ट केले.
या सर्व आरोपांना ओनलर कोम यांनी ठामपणे नकार दिला आहे. त्यांनी मेरी कोमचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले. “ती माझ्यावर पाच कोटी रुपये चोरल्याचा आरोप करते. माझं बँक अकाउंट तपासून बघा. माझं राहणीमान पाहा. मी दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहतो. माझ्याकडे प्रचंड पैसा असता, तर मी अशी परिस्थिती भोगत असतो का?” असा सवाल ओनलर यांनी उपस्थित केला. त्यांनी असेही म्हटले की, मेरी कोम एक मोठी सेलिब्रिटी असल्याने ती जे बोलेल, ते लोक सहज विश्वासाने स्वीकारतील, पण प्रत्यक्षात सत्य वेगळे आहे.
ओनलर यांनी पुढे सांगितले की, 18 वर्षे ते दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहिले. “मी माझी लग्नाची अंगठी काढून टाकली आहे, कारण आता विश्वास उरलेला नाही. ती लोकअदालतीत जाऊन माझ्यावर कर्ज घेतल्याचे आणि मालमत्ता चोरल्याचे आरोप करते. जर मालमत्ता माझ्या नावावर आहे, तर तिच्याकडे त्याचे पुरावे असतील, ते तिने सादर करावेत,” असे आव्हान त्यांनी दिले.
मेरी कोम आणि ओनलर यांचे लग्न 2005 साली झाले होते. या दाम्पत्याला चार मुले आहेत. 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला असला, तरी एकमेकांवरील आरोपांमुळे हा वाद अद्याप संपलेला नाही. भारताच्या क्रीडा इतिहासात एक प्रेरणादायी आयकॉन म्हणून ओळख असलेल्या मेरी कोमच्या वैयक्तिक आयुष्यातील हा संघर्ष आता सार्वजनिक चर्चेचा विषय ठरत असून, पुढे या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
