1983 पूर्वीचं भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या उणिवा अधिक सांगायला हव्यात. आता भारतीय क्रिकेटच्या समृद्धीच्या तुलनेत इतर सर्व खेळांची चमक फिकी पडली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वांत शक्तिशाली आणि श्रीमंत क्रीडा संघटनांपैकी एक आहे. आता क्रिकेटर्सचं स्टारडम, स्टेटस आणि करोडोंची संपत्ती हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
पहिल्या दोन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपण ज्या प्रकारे हरलो होतो ते खरोखरच लाजिरवाणं होतं. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटला कोण गांभीर्यानं घेईल? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, 1983 या वर्षाने भारतीय क्रिकेटला जे वळण दिलं त्यानंतर भारतीय क्रिकेटनं आजतागायत मागे वळून पाहिलं नाही. त्यावेळच्या भारतीय क्रिकेट टीमकडून कुणालाही अपेक्षा नव्हती. त्यामुळे जेव्हा कपिलच्या 'देव' च्या याच टीमनं अनपेक्षितपणे तिसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला तेव्हा संपूर्ण देशाला आनंद झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेटची सर्वांगीण भरभराट झाली.
advertisement
तेव्हा बीसीसीआयकडे टीम पाठवण्यासाठीही नव्हते पैसे
पूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे पैसे नव्हते. जेव्हा 1983 मध्ये आपल्या क्रिकेट टीमला तिसऱ्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा टीमला मिळालेलं किट आणि शूज आजच्या तुलनेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. आताची टीम चार्टर्ड विमानानं किंवा बिझनेस क्लासनं प्रवास करते, पण त्यावेळी इकॉनॉमी क्लासचा खर्च भागवणंही कठीण होतं.
इंग्लिश मीडियाने उडवली होती कपिलच्या टीमची खिल्ली
83 च्या वर्ल्ड कपसाठी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला पोहोचली तेव्हा इंग्लिश मीडिया त्यांची खिल्ली उडवण्यात व्यस्त होता. या टीमची माफक दर्जाच्या हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय टीमला संपूर्ण स्पर्धेरम्यान प्रत्येक सामन्यासाठी फक्त 1500 रुपये फी मिळायची. दैनंदिन भत्ता 200 रुपये होता, या पैशांमध्ये इंग्लंडमध्ये कपडे धुवायला टाकणंही शक्य नव्हतं.
तोपर्यंत सर्व काही बदललं होतं
28 वर्षांनंतर, 2011 मध्ये जेव्हा टीम इंडियानं पुन्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सर्व काही बदललं होतं. आत्ताची टीम चार्टर्ड विमानानं प्रवास करू लागली होता. खेळाडूंना फाईव्ह आणि सेव्हन स्टार्स हॉटेल्समध्ये राहायला मिळालं. टीमकडे असलेलं क्रिकेट किट हे जगातील सर्वोत्तम किट होतं. या सर्व गोष्टींचा पाया 83च्या वर्ल्ड कप विजयानं रचला होता.
ना कोच, ना सपोर्ट स्टाफ, ना फिजिओ
वर्ल्ड कप खेळण्यासाठी कपिल देवसोबत टीम इंग्लंडला पोहोचली तेव्हा टीमला कोच, सपोर्ट स्टाफ, विश्लेषक आणि फिजिओ असं काहीही नव्हतं. पी. आर. मानसिंग यांना टीम मॅनेजर म्हणून पाठवलं होतं. ते एकमेव व्यक्ती होते ज्यांनी टीमचं बँक अकाउंट आणि मीडियाशी संबंधित बाबी हाताळल्या. त्यांनी टीमची हॉटेल, वाहतूक आणि इतर व्यवस्था बघितली. त्यानंतर दशकभरातच भारतीय टीमला संपूर्ण सपोर्ट स्टाफ मिळू लागला. टीमसोबत कोच, फिजिओ आणि इतर सपोर्ट स्टाफ देण्यात आला. आणखी काही वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमचा सपोर्ट स्टाफ आणखी विस्तारला. आता एक कोच, एक बॅटिंग कोच, एक बॉलिंग कोच, एक विश्लेषक आणि काही सहाय्यक या स्टाफमध्ये असतात.
तेव्हा आपल्या क्रिकेट स्टेडियमला सेकंड क्लास म्हटल जायचं
त्याकाळी क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या नावाखाली भारतात अस्तित्वात असलेली स्टेडियम्स पाहता इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारखे देश त्यांना सेकंड क्लास ग्राउंड्स मानायचे. अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारत दौऱ्यावर येण्यास नकार दिला होता कारण इथे खेळायला गेल्यास त्यांची प्रकृती बिघडेल असं त्यांना वाटत होतं. त्यांना कोणतीही सुविधा मिळणार नाही. हा तोच काळ होता जेव्हा भारतीय क्रिकेटपटू दरवर्षी काउंटी क्रिकेट लीगमध्ये पैसे कमावण्यासाठी स्पर्धा करत असत आणि तिथे कोणत्याही सामान्य क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली खेळायला तयार असत.
मग हळूहळू पैसे, सुविधा आणि दर्जाही आला
83 सालानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पैसे आणि सुविधा किंवा चांगल्या पायाभूत सुविधा लगेच आल्या नाहीत. पण भारतीय क्रिकेटमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली हे निश्चित. हॉकी किंवा फुटबॉलऐवजी लोक फक्त क्रिकेटच खेळताना दिसायची. हा तो काळ होता जेव्हा बीसीसीआयमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. तेव्हा एक अधिकारी असा होता ज्याला आयसीसीमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व संपवायचं होतं.
एका अधिकाऱ्याने इंग्लंडकडून वर्ल्ड कप यजमानपद हिसकावून भारतात आणलं
हे अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून जगमोहन दालमिया होते. त्यांनी क्रिकेटमधील कृष्णवर्णीय देशांचं कॉकस बनवलं होतं, ज्यात श्रीलंका, पाकिस्तान, भारत आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश होता. या कॉकसनं आयसीसीमध्ये केवळ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला आव्हानच दिलं नाही तर पुढील वर्ल्ड कपच यजमानपदही इंग्लंडकडून हिसकावून घेतलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्ताननं मिळून 1987 च्या वर्ल्ड कपचं आयोजन केलं. परिस्थिती अशी होती की, बीसीसीआयकडे या स्पर्धेच्या आयोजनासाठी हमी देण्यासही पैसे नव्हते. अशावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजनं बीसीसीआयला ही रक्कम देण्यासाठी मदत केली.
भारत-पाकिस्तानमध्ये झाला 1987चा वर्ल्ड कप
भारत आणि पाकिस्तान यांच्यात संयुक्तपणे हा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. अर्थातच भारतानं तो जिंकला नाही पण त्यातून दोन गोष्टी शिकता आल्या. वर्ल्ड कपमधून पैसे कसे कमावता येतात आणि दुसरं म्हणजे प्रसारण हक्कांमध्ये अमाप पैसा असतो. त्यामुळे बीसीसीआयनं या प्रसारणांवर हक्कांवर अधिकार सांगावा.
क्रिकेटच्या प्रसारणासाठी दूरदर्शन घेत असे पैसे
तोपर्यंत दूरदर्शन भारतीय क्रिकेट सामन्यांचे विनामूल्य प्रक्षेपण करत नसे, उलट या मॅचेसच्या प्रसारणासाठी बीसीसीआयकडून प्रत्येक मॅचसाठी प्रचंड शुल्क आकारलं जात असे. 90च्या दशकात घडणारी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे उदारीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली. जे मोठे ब्रँड अमेरिका आणि युरोपमधून भारतात येऊ पाहत होते त्यांना खेळाची ताकद आणि ब्रँड्स खेळाच्या लोकप्रियतेचा कसा फायदा घेऊ शकतात हे चांगलंच ठाऊक होते.
बीसीसीआयला मिळाली सोन्याची अंडी देणारी कोंबडी!
या कंपन्यांनी यापूर्वीही अमेरिका आणि युरोपमध्ये हे काम करून पाहिलं होते. जेव्हा त्याची नजर भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाकडे वळली तेव्हा त्यांना क्रिकेट आणि क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड क्षमता दिसली. या मार्केट पॉवरनं भारतीय क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. जेव्हा क्रिकेटच्या प्रसारण हक्काची जबाबदारी कायदेशीररित्या बीसीसीआयकडे गेली आणि मार्केटमध्ये लोकप्रिय झाल्यावर क्रिकेटने भारतात अशी झेप घेतली ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आता बीसीसीआयची सर्वात जास्त कमाई प्रसारण हक्कातून होते.
बीसीसीआय आणि क्रिकेटपटू झाले मालामाल
क्रिकेटच्या प्रसारणाचे अधिकार मिळाल्यानंतर बीसीसीआयची गरिबी संपली. क्रिकेटपटूंची फी वाढू लागली आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळू लागल्या. 1996 च्या वर्ल्ड कप आयोजनानंतर बीसीसीआय खऱ्या अर्थानं श्रीमंत झालं. बीसीसीआयची तिजोरी काठोकाठ भरली. हाच तो काळ होता जेव्हा या बीसीसीआयची जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटनांमध्ये गणना होऊ लागली. एकीकडे प्रसारण हक्कातून प्रचंड पैसे मिळत होते आणि दुसरीकडे प्रायोजकांची रांग लागली होती. एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये संपत्ती आणि शक्तीचं एक वेगळंच विश्व तयार झालं.
सचिनच्या 100 कोटींच्या डीलनं सर्वांनाच बसला धक्का
1992 च्या आसपास, वर्ल्डटेलचे संस्थापक मार्क मर्सेनहेज यांनी सचिन तेंडुलकरसोबत अनेक वर्षांसाठी 100 कोटी रुपयांचा मोठा करार केला. हे पाहून देशभरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. क्रिकेटपटूंसोबत वैयक्तिक मार्केटिंग कॉन्ट्रँट करण्याची ही सुरुवात होती, जी आता अगदी सामान्य झाली आहे. आता प्रत्येक मोठा क्रिकेटपटू एका वर्षात 100 कोटींहून अधिक पैसे कमावतो. एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या क्रिकेटपटूंचं हजारो कोटींचं नेटवर्क आहे. क्रिकेटच्या खेळातून एवढा पैसा या देशात येईल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. बीसीसीआय स्वतः एका वर्षात ब्रॉडकास्टिंग राइट्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमावते. आयपीएलसारख्या लीगनं तर प्रचंड नफा कमावण्याचा नवा मार्ग खुला केला.
World Cup : वर्ल्ड कपसाठी लंकेने घेतली रिस्क, संघात दुखापत झालेले दोन फिरकीपटू
तेव्हा कपिलच्या टीमला बक्षीस देण्यासाठी पैसे नव्हते
एक वेळ अशी होती जेव्हा कपिल देव यांची टीम 83वर्ल्ड कप जिंकून परतली होती तेव्हा बीसीसीआयकडे प्रत्येक खेळाडूला बक्षीस देण्यासाठी एक लाख रुपयेही नव्हते. त्यासाठी लता मंगेशकर यांची मदत घेण्यात आली आणि मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यातून जमा झालेल्या पैशातून टीममधील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये देण्यात आले.
2011च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमवर पडला पैशांचा पाऊस
2011मध्ये जेव्हा भारतीय टीमनं मुंबईत वर्ल्ड कप जिंकला तेव्हा प्रत्येक खेळाडूवर बक्षीस म्हणून करोडो रुपयांचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये दिले आणि प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यांतील खेळाडूंना करोडो रुपये दिले. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांना जाहिरातींचे कॉन्ट्रँट दिले.
1983च्या वर्ल्ड कप विजयानं भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना भविष्यात कसं श्रीमंत केलं हे तुम्हीच बघा. आता विचार करण्यासारखी बाब अशी आहे की, जर 70च्या दशकापासून आपली हॉकी कमकुवत होऊ लागली नसती, तर तो खेळही क्रिकेट एवढ्या उंचीवर गेला असता का?, हॉकीचे खेळाडूही यशाच्या लाटेवर स्वार झाले असते तर आज तेही पैशांमध्ये लोळले असते का?