सुरेश रैना टीम इंडियाचा कर्णधार असताना परवेझ रसूलने भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मीरपूर येथे झालेल्या या सामन्यात रसूलने 10 ओव्हर बॉलिंग करून 60 रन दिल्या आणि 2 विकेटही घेतल्या. बांगलादेशचा बॅटर अनामुल हक हा रसूलची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरला, यानंतर त्याने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहीमलाही आऊट केलं
परवेझ रसूल विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध पहिली टी-20 खेळला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रसूलने आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना 6 बॉलमध्ये 5 रन केले. तसंच त्याने 4 ओव्हर टाकून 32 रन दिल्या आणि मॉर्गनची विकेट घेतली. आयपीएलमध्ये रसूल पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्याकडून एकूण 11 सामने खेळला, ज्यात त्याला फक्त 4 विकेट मिळाल्या, तसंच त्याने 17 रनही केल्या.
advertisement
स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं
16 नोव्हेंबर 2008 रोजी रसूलने धर्मशाला येथे हिमाचल प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यातून प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केलं. रसूलने 95 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्याने 352 विकेट घेतल्या आणि 5,648 रन केल्या. तसंच 164 लिस्ट ए सामन्यांमध्ये आणि 71 टी-20 सामन्यांमध्ये रसूलने अनुक्रमे 3,982 आणि 840 रन केल्या. तसंच त्याच्या नावावर 221 लिस्ट ए आणि 60 टी-20 विकेट आहेत.
'मी जेव्हा खेळायला सुरूवात केली, तेव्हा अनेकांनी जम्मू काश्मीर क्रिकेटला गांभीर्याने घेतले नाही. आम्ही काही मोठ्या टीमना पराभूत केलं. रणजी ट्रॉफी आणि बीसीसीआय संलग्न स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. मी बराच काळ टीमचं नेतृत्व केलं. टीमच्या यशात योगदान दिल्याचं मला समाधान आहे', असं परवेझ रसूल स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे.
परवेझ रसूलने 2013-14 आणि 2017-18 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम ऑलराऊंडरचा लाला अमरनाथ पुरस्कार जिंकला. तसंच रसूलने अलीकडेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सकडून लेव्हल-2 कोचिंग सर्टिफिकेशन उत्तीर्ण केलं आहे. पूर्णवेळ कोचिंग करून तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करायचं आहे, तसंच परदेशी लीगमध्ये खेळायचं आहे, असं परवेझ रसूल म्हणाला आहे.